नागपूरी संत्र्यांचे उत्पादन ६५ टक्के घटले

santra
नागपूर- सतत दुसर्‍या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे नागपूर मधील हिवाळी संत्र्यांच्या उत्पादनात यंदा ६५ टक्के घट आली असल्याचे समजते. दरवर्षी हिवाळी हंगामात सरासरी ९ लाख टन संत्रे उत्पादन होते ते यंदा तीन लाख टनांवर आले असल्याचे संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष अमोल तोते यांनी सांगितले. संत्र्यांच्या नर्सरींचेही यंदाच्या दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. मात्र यंदा पाऊस चांगला होईल असे अंदाज दिले जात असल्याने शेतकरी निदान जुलै, ऑगस्टचा नवा बहार तरी चांगला असेल अशी अपेक्षा करत आहेत.

संत्रा उत्पादक नरेशचंद्र ठाकरे म्हणाले, आमच्या बागांत यंदा जेमतेम ३० टक्के उत्पादन झाले आहे.दुष्काळामुळे केवळ फळेच सुकली नाहीत तर झाडेही सुकून गेली आहेत. दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रात संत्र्यांची नवीन लागवड केली जात असते. ही नवीन झाडेही यंदा सुकली आहेत. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात नवीन झाडे मोठ्या प्रमाणावर सुकून गेली आहेत.

सप्टेंबर आक्टोबर हा हिवाळी संत्र्यांचा काढणी हंगाम असतो. यंदा पाऊस जास्त होईल असा अंदाज दिला जात आहे. काढणी हंगामाच्या वेळी सतत पाऊस राहिला तरी संत्र्यांचे नुकसान होणार आहे. कारण सतत पावसाने संत्री कुजून जातात असेही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. मात्र यंदा पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा उन्हाळी हंगामासाठी नक्कीच होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment