स्टेट बँकेत पाच बँकांचे विलीनीकरण !

sbi
नवी दिल्ली : पाच सहकारी बँका आणि भारतीय महिला बँकेचे स्टेट बँकेत एकत्रिकरण करण्यात येणार असून सध्या आमचे लक्ष या एकत्रिकरणाच्या विषयावर असल्यामुळे यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. त्यांनी ही माहिती सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय संस्थांनाच्या अध्यक्षांसह झालेल्या बैठकीत दिली.

भारतीय स्टेट बँकेत स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँका सहभागी आहेत. सध्या भारतीय स्टेट बँकेच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. हा प्रस्ताव सरकारकडे असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातील. सरकारचे धोरण बरेच काही एकत्रीकरण करण्याचे आहे. देशाच्या अर्थसंकल्पातही तसे आम्ही संकेत दिलेले आहेत, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे. सरकारकडून बँकांच्या या विलीनीकरणास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. मागील महिन्यात भारतीय स्टेट बँकेने आपल्या सहकारी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँकेने विलीनीकरणास सरकारकडे मंजुरी देण्याची मागणी केली आहे. भारतीय स्टेट बँक या विलीनीकरणानंतर ३७ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा आधार आणि ५० कोटींहून अधिक ग्राहक असणारा मोठी बँक बनणार आहे. स्टेट बँकेत याआधी २००८ मध्ये स्टेट बँकेची सहकारी बँक बँक ऑफ सौराष्ट्रचे विलीनीकरण करण्यात आले होते. पुन्हा दोन वर्षांनंतर स्टेट बँक ऑफ इंदौरचेही विलीनीकरण करण्यात आले.

Leave a Comment