सतत चर्चेत असलेल्या शनीदेवाच्या शनिशिंगणापूरपासून केवळ सात किमी अंतरावर सोनई येथे असलेले आदिशक्ती रेणुकामाता मंदिर एका अनोख्या कारणाने देशात प्रसिद्ध आहे. या मंदिरात ॐ कार यंत्राची स्थापना केली गेली असून जगभरातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर आहे. रेणुकादेवीचे हे मंदिर राजस्थानातील कुशल कारागिरांनी काचेच्या अनेक तुकड्यांतून सजविले आहे. त्यामुळे त्याला ग्लास टेंपल असेही म्हणतात.
सोनईचे स्वयंभू रेणुकामाता मंदिर
असे सांगितले जाते की प्राचीन काळी नवनाथांतील एक मछिंद्रनाथ यांनी सोन्याची वीट फेकली होती. ती ज्या ठिकाणी पडली ते स्थान म्हणजे सोनई. पूर्वी या गावाला स्वर्णमयी असेही म्हणत असत. १८५४ साली रेणुकादेवीचे मंदिर उभारले गेल्याचे सांगितले जाते. आदिशक्ती रेणुका येथे स्वयंभू रूपात प्रकटली. या मंदिर परिसरात अनेक इतर मंदिरेही आहेत. त्यात सप्तयोगिनी, दत्त, कालभैरव, जलदेवता, नागदेवता, औंदुंबर छाया, वेताळ यांची मंदिरे आहेत. प्रवेशद्वाराजवळ आठ फुटांची भव्य दुर्गामूर्ती आहे.
वर्षभर या मंदिर समुहात ६३ प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत दररोज पूजन, भजन, आरती, नामस्मरण अशी उपासना केली जाते. तसेच शतचंडी, पंचकुडी, विष्णु, गीता, शिव, गायत्री यज्ञांचेही आयोजन नियमितपणे केले जाते.