चेन्नई – सप्टेंबरमध्ये रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांची गव्हर्नरपदाची मुदत संपत असून त्यांना मुदतवाढ द्यायची की नाही यावर वाद सुरू आहे. राजन यांच्या मुदतवाढीचे समर्थन करण्यासाठी ऑनलाइन याचिकांवर भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
ही याचिका चेंज डॉट ओआरजीवर असून राजन यांना मोदी यांनी मुदतवाढ द्यावी असे या याचिकेत म्हटले आहे. एकूण पाच याचिका राजन यांच्या बाजूने असून त्यावर ६० हजार स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. रघुराम राजन हे चांगले काम करीत असून, अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहेत असे एका याचिकेत म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रघुराम राजन यांना मुदतवाढ देऊ नये व तातडीने पदावरून दूर करावे यासाठी प्रयत्न केला आहे. परंतू सरकारने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. लोकेश रस्तोगी यांनी राजन यांच्या विरोधातील याचिकेत राजन हे सरकारच्या धोरणानुसार काम करीत नसल्याने त्यांना मुदतवाढ देऊ नये असे म्हटले आहे. या ऑनलाइन याचिकेवर फक्त १६ जणांनी स्वाक्षरी केली आहे.