ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पातून अदानींची माघार!

gautam-adani
मेलबोर्न : ऑस्ट्रेलियात जगातील सर्वांत मोठी खाण बांधण्याच्या प्रकल्पातून अदानी ग्रुप माघार घेण्याची शक्यता असून सातत्याने पर्यावरणप्रेमींनी कायदेशीर आव्हाने दिल्याने होत असलेल्या विलंबाने त्रस्त होऊन अदानी समूहाने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील १० अब्ज डॉलरच्या कारमायकेल खाण, रेल्वे आणि बंदर प्रकल्पाला तेथील हरित गटांनी सातत्याने कायदेशीर आव्हाने दिली आहेत.

कायदेशीर आव्हानामुळे दीर्घकाळ विलंब होत असल्यामुळे आम्ही कदाचित या प्रकल्पातूनच बाहेर पडू, अशी माहिती अदान समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीच द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राला दिली. गौतम अदानी म्हणाले की, तुम्ही असेच लटकत किती काळ राहू शकणार? खूपच विलंब होत असल्याने मी खरोखरच निराश झालो आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड सरकारने अदानी समूहाला कारमायकेल येथील ११ अब्ज टन कोळसा उत्खनन करून काढण्यासाठी मान्यता दिली होती. त्याचबरोबर खाणीशी संबंधित रस्ते, वर्कशॉप्स, विजेच्या तारा आणि पाईपलाईन्स टाकण्यासही मान्यता दिली.पर्यावरणप्रेमी मात्र विविध आघाड्यांवर अदानी समूहाला जेरीस आणत असून बँकांकडे त्यांनी अदानींना कर्ज देऊ नका, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment