या मंदिरात मूर्ती ऐवजी श्रीयंत्राची होते पूजा

ambaji
गुजराथ मधील पार्वतीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाजी मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर त्याऐवजी येथे श्रीयंत्राची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार यज्ञात उडी घेऊन प्राण दिलेल्या शंकर पत्नी सतीचे हृदय या ठिकाणी पडले होते. तंत्र चूडामणी ग्रंथातही याचे उल्लेख येतात. गुजराथ राजस्थान सीमेवरच्या अरवली पर्वतरांगातील अरासुर पर्वतावर हे प्राचीन मंदिर आहे.

येथील गर्भमंदिरात मूती नाही तसेच भाविक येथे स्थापलेल्या श्रीयंत्राचे नुसत्या डोळ्यांनी दर्शन घेऊ शकत नाहीत.येथे फोटोही काढता येत नाहीत. मात्र मूर्ती नसली तरीही येथील पुजारी गर्भगृहात अत्यंत सुंदर प्रकारे अशी पूजा करतात की साक्षात देवी येथे आहे असाच भाविकांना भास होतो. येथे अखंड नंदादीपही आहे. तो कधीच विझलेला नाही असेही सांगितले जाते.

येथून ३ किमी अंतरावर गब्बर पहाडा येथे देवीचे पुरातन मंदिर आहे. येथे खडकावर देवीच्या पाऊलखुणा आहेत तसेच रथचिन्हांच्या खुणाही आहेत. या जागीच श्रीकृष्णाचे जावळ काढले गेले होते व येथेच रामाने शक्तीची उपासना केली होती अशी श्रद्धा आहे. भाद्रपदात पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते तसेच नवरात्रातही हजारो भाविक माता सतीच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळी गरबा आणि भवाई नृत्याने देवीची आराधना केली जाते.

Leave a Comment