देव सोन्याचा भुकेला?

temple
आपल्या महाराष्ट्रातल्या साधूसंतांनी नेहमीच अशी ग्वाही दिलेली आहे की देवाला पैसा, नैवेद्य, दागिने लागत नाहीत. ज्याच्या मनात भाव असेल त्यालाच देव पावतो. म्हणजेच देव भावाचा भुकेला. मनात भाव नसेल तर देव पावत नाही. तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशांनी पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अर्थात संतांनी आपल्याला कितीही सांगितले असले तरी आपली खोड काही जात नाही. देव पैशाचा भुकेला आहे असे आपण मानतो. म्हणून देवाला नवस बोलणे त्याच्यासमोर जास्त पैसे टाकणे किंवा देवाला सोन्याचे दागिने वाहणे असे प्रकार आपण सर्रास करतो आणि देवाला जेवढी महाग वस्तू अर्पण केली असेल तेवढा देव आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो अशी भावना आपण बाळगतो. म्हणूनच देशातले सर्वाधिक सोन्याचे भांडार देवळांमध्ये साठवलेले आहे. याचा प्रत्यय अनेकवेळा येतसुध्दा असतो. विविध धनाढ्य व्यक्तींनी तिरुपतीचा बालाजी किंवा शिर्डीचे साईबाबा यांना किती सोने अर्पण केले, किती कोटी रुपयांचा हिर्‍याचा हार घातला याच्या बातम्या आपण नित्य वाचत असतो.

केंद्र सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला आहे. आपल्या देशाचा व्यापारी तोटा फार मोठा आहे. याचा अर्थ आपण भरपूर आयात करतो पण त्यामानाने निर्यात कमी करतो. म्हणजे आपण परदेशांना फार कमी वस्तू विकतो मात्र परदेशाकडून खूप आयात करतो. परिणामी आयात जास्त आणि निर्यात कमी अशी अवस्था निर्माण होऊन व्यापारी तोटा वाढतो. या तोट्याचे रूपांतर फायद्यात केल्याशिवाय आपला व्यापारी नफा वाढणार नाही आणि रुपयाची किंमतसुध्दा वाढणार नाही. हे सरकारला लक्षात आले आहे. तेव्हा आपली आयात कमी करायची असेल तर जास्तीत जास्त आयातीचा खर्च कशावर होतो याचा शोध घेतला गेला आणि लक्षात असे आले की आपण पेट्रोल आणि सोने या दोन गोष्टी आयात करण्यावर प्रचंड खर्च करत असतो. मग आयात कमी करायची असेल तर ती नेमकी कशात करावी? पेट्रोलची आयात तर कमी होऊ शकत नाही. कारण पेट्रोल म्हणजे वाहतूक आणि वाहतूक म्हणजे विकास. हे आपल्याला कळते. सोने मात्र अनुत्पादक असते. त्यामुळे सोन्याची आवक कमी करावी, त्याचबरोबर देशात पडून असलेले सोने अधिकाधिक प्रमाणात वापरावे असा प्रयत्न सरकारने करून पाहिला. मात्र लक्षात असेे आले लोक सोन्याचा साठा करतात पण तो साठा करून घरातच ठेवतात. त्यात लाखो रुपये गुंतवतात पण असे पैसे गुंतवण्याऐवजी सोन्याचे रुपांतर पैशात करावे आणि तो पैसा विकासासाठी वापरावा असा काही कोणी विचार करत नाही.

म्हणून सरकारने सोन्याचे पैशात रुपांतर करण्याच्या योजना आखल्या तरी त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आता सरकारने मंदिरांकडे असलेल्या सोन्यावर लक्ष केंद्रीत केले. तेव्हा असे लक्षात आले की तिरुपती, शिर्डी, सिध्दीविनायक, सोमनाथ, उज्जैनचा महांकालेश्‍वर अशा मंदिरांमध्ये अमाप सोने साठवलेले आहे. या सार्‍या देवांचे भक्त देवाला हे सोने अर्पण करतात आणि ते सोने मंदिरांकडे पडून असते. याचा अर्थ अब्जावधी रुपयांची संपत्ती मंदिरातील सोन्यांमध्ये गुंतून पडली आहे. ते आपल्या श्रीमंतीचे लक्षण आहे हे गोष्ट खरी परंतु असा पैसा पडून असल्यामुळे विकास योजना मार्गी लागत नाहीत आणि देशाची गरीबी वाढते. म्हणजे आपल्या मंदिरात पडून असलेले सोने हे आपल्या श्रीमंतीचे लक्षण तर आहेच पण आपल्या गरीबीचे कारण आहे. तेव्हा गरीबी दूर करायची असेल तर मंदिरात पडून असलेले सोने उत्पादक कामांसाठी वापरले पाहिजे.

मुळात मंदिरांमध्ये एवढे सोने येते कसे? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. या मागे लोकांचा भोळा भाव आहे. या संबंधात दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक विधान केलेले आहे आणि ते सत्य आहे. लोक जेवढे जास्त पाप करतील तेवढे सोने मंदिरात जास्त येईल असे ते म्हणाले. म्हणजे लोक पाप करतात आणि त्या पापाबद्दल देवाने आपल्याला शिक्षा करू नये म्हणून देवाला सोन्याच्या रूपात लाच देतात. ही लाच पैशाच्या रूपात दिली तर ते पैसे पुजारी लोक खर्च करून टाकतील आणि देवाजवळ काहीच शिल्लक राहणार नाही असे त्यांना वाटते पण सोने दिले तर ते सोने मात्र पुजारी खर्च करत नाहीत ते देवाजवळ कायम राहते आणि जितके दिवस देवाजवळ सोने राहते तितके दिवस देवाची कृपा आपल्यावर राहते. म्हणजे आपण कितीही पाप केले तरी त्या पापाचा उपद्रव आपल्याला होऊ नये यासाठी आवश्यक असलेले संरक्षक कवच त्या सोन्याच्या देणगीमुळे देव आपल्याला प्रदान करतो असे त्यांना वाटते. म्हणून बरेच पाप करून पैसा मिळवलेले धनिक लोक देवाला पैसे देण्याच्या ऐवजी हिरे, मोती आणि सोने यांचाच चढाव चढवतात. यातल्या धर्मासंबंधीच्या कितीतरी विपरित कल्पना आपल्याला चिंता वाटावी अशा आहेत. मुळात पाप करावेच कशाला? पण पाप केले तरी देवाला लाच दिल्याने त्या पापाचे निवारण होते ही कल्पनाही चुकीची आहे. धर्म ही साधी गोष्ट आहे. कोणालाही त्रास देऊ नका हाच धर्म असतो. पण या लोकांना कळणार कधी?

Leave a Comment