मोबाईलमुळे कर्करोग होण्याची शक्यता

mobile
वॉशिंग्टन : अमेरिकी सरकारच्या एका फेडरल एजन्सीने आपल्या अडीच वर्षांच्या संशोधनानंतर आश्चर्यकारक खुलासे केले असून त्यात म्हटले आहे की, मोबाईलशी हृदय आणि मेंदूच्या ट्यूमरचा संबंध आहे. मोबाईलपासून निघणा-या रेडिएशनचा वैज्ञानिकांनी प्रयोग सुमारे २५०० उंदरांवर केला.

ग्राहकांच्या आरोग्यावर मोबाईलचा होणारा परिणाम यावर अमेरिकी सरकार संशोधन करीत आहे. त्याचा पहिला अहवाल जारी करण्यात आला आहे. नॅशनल टॉक्लिकॉलॉजी प्रोग्रामनुसार (एनटीपी) वैज्ञानिकांनी उंदरांना फोनमधून निघणा-या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या संपर्कात ठेवले. त्यामुळे उंदरांच्या मेंदूत आणि हृदयात दोन प्रकारचे ट्यूमर विकसित झाल्याचे आढळले. वैज्ञानिकांनी सलग अडीच वर्षे हे प्रयोग केले. वैज्ञानिकांनी छोट्या उंदरांवर ९०० मेगाहर्ट्झ व मोठ्या उंदरांवर १९०० मेगाहर्ट्झ रेडिएशन सोडले. संशोधनात म्हटले आहे की, रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे निघणा-या रेडिएशनचा धोका प्रत्येक वयाच्या व्यक्तीवर होतो. त्याचा प्रभाव खूप वाईट आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, मोबाईलचा वापर आणि त्याचा कॅन्सरशी संबंध याबाबत आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे संशोधन आहे.

अमेरिकी सरकारने सुमारे १६८ कोटी रुपये या संशोधनासाठी दिले असून एनटीपीच्या संशोधनात सहभागी रॉन मेलनिक यांनी सांगितले की, मोबाईलच्या वापराने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, असे अनेक लोक म्हणतात पण मला वाटते की, या संशोधनानंतर लोकांना आपले मत बदलावे लागेल. दुसरीकडे संशोधनाशी संबंधित वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, रेडिएशनमुळे ट्यूमर झाल्यानंतर कोणते बदल शरीरात होतात याचा अभ्यास आम्ही सध्या काही नर उंदरांवर करत आहोत.

त्यानंतर सीडीएमए आणि जीएसएम मोबाईल बनविणा-या कंपन्यांद्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमध्ये (आरएफआर) बदल करता येईल. मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आणि एक्सरेमुळे कॅन्सरचा धोका सर्वांत जास्त आहे. सरकार या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर २०१७ मध्ये लोकांचे मत घेईल. त्याशिवाय संशोधनाचे आणखी काही निष्कर्ष प्रकाशित करेल. अमेरिकेत सुमारे ९० टक्के लोक मोबाईलचा वापर करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment