जीवसृष्टी १२०० प्रकाशवर्षे दूर असू शकते

keplar
वॉशिंग्टन : एका ग्रहावर पृथ्वीपासून १२०० प्रकाशवर्षे दूर जीवसृष्टी असल्याचे संकेत मिळाले असून ‘केपलर-६२ एफ’ नावाने या ग्रहाच्या पृष्ठभागावर संशोधकांनुसार पाणी असू शकते. (प्रकाशवर्ष हे मापक प्रकाशाकडून एक वर्षात गाठल्या जाणा-या अंतरासाठी वापरले जाते.) याचा शोध युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी लावला आहे. या संशोधकांचे नेतृत्व करणारे आओमावा शील्ड्स यांच्यानुसार ‘केपलर-६२ एफ, पृथ्वीपेक्षा ४० टक्के मोठा आहे’ . तेथे टेकडी आणि समुद्र असण्याचीदेखील शक्यता आहे. नासाच्या केपलर मोहिमेने २०१३ मध्ये प्लॅनेटरी सिस्टीम शोधली होती. केपलर-६२ एफ याच सिस्टीमचा हिस्सा आहे.

आम्हाला जी वातावरणीय रचना आढळली त्यानुसार केपलर-६२ एफच्या पृष्ठभूमीवर द्रवरूपी पाणी असण्याची प्रबळ शक्यता आहे. ही शक्यता तेथे जीवन असण्याकडे इशारा करते असे शील्ड्स यांनी सांगितले. पृथ्वी आणि सूर्याच्या तुलनेत केपलर-६२ एफ आपल्या ता-यापेक्षा खूपच अधिक अंतरावर आहे. याचा अर्थ तेथील वातावरणात अधिक कार्बन डाय ऑक्साईड असणार आहे. तो तेथील जमिनीवर द्रवरूपी पाणी आणि बर्फ कायम ठेवण्यास सहायक ठरेल असे त्यांनी म्हटले.

केपलर मोहिमेद्वारे शोधण्यात आलेल्या प्लॅनेटरी सिस्टीममध्ये केपलर-२२ बी, केपलर-६९ सी, केपलर-६२ ई आणि केपलर-६२ एफ नावाचे ग्रह आहेत. केपलर-६२ एफ याचा सर्वात बाहेरील ग्रह आहे. तो एका ता-याभोवती फे-या मारतो, हा तारा सूर्याच्या तुलनेत शीत आहे. परंतु केपलर-६२ एफची कक्षा, आकार, रचना किंवा वातावरणाची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment