रिलायन्सला लागले लष्करी उत्पादनांचे वेध

Anil-Ambani
मुंबई: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या ‘रिलायन्स’ला आता लष्करासाठी हेलिकॉप्टरपासून पाणबुड्यांपर्यंत विविध उत्पादने बनविण्याचे वेध लागले आहेत. यासाठी ‘रिलायन्स’चे प्रमुख अनिल अंबानी आग्रही असून समूहाने विविध लष्करी उत्पादनांची तब्बल ८४ हजार कोटी रुपयांची कंत्राटे मिळविण्यासाठी बोली लावली आहे.

रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योग समूहासाठीही लष्करी उत्पादनांच्या क्षेत्रात पदार्पण ही मोठी जोखीम मानली जात आहे. रिलायन्सने अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये आपला जम बसविला असला तरीही लष्करी साधनसामुग्रीच्या उत्पादनांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्य किंवा अनुभव सध्या समूहाकडे नाही. त्यासाठी रिलायन्सला विदेशी कंपन्यांकडून तांत्रिक भागीदारी मिळविणे, आपणही लष्करी उत्पादने तयार करू शकतो असा विश्वास संबंधितांमध्ये निर्माण करणे आणि लष्करी उत्पादनांच्या खरेदीला शासकीय पातळीवर असलेल्या कासव गतीला वेग देणे ही आव्हाने रिलायन्ससमोर असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी मोहीमेमध्ये लष्करी उत्पादनांना महत्वाचे स्थान आहे. विदेशी कंपन्यांशी भागीदारी करून तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून भारतीय उद्योगांनी लष्करी उत्पादनांमध्ये पदार्पण करावे; अशी पंतप्रधानाची अपेक्षा आहे. त्यानुसार रिलायन्स या क्षेत्रात येण्यास उत्सुक असून; आमच्याकडे अनुभवाची कमतरता असली तरीही नवी आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता ही आपली मोठी क्षमता आहे; असा विश्वास अंबानी यांना आहे.

Leave a Comment