भुकेल्या जीवांना सुखाचा घास…

mittal
समाजकार्य म्हणजे काय असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. लोकांना असे वाटते की ज्या माणसाला कामधंदा नसतो. तो बेकार माणूस लोकांसाठी काहीतरी करतो तेच समाजकार्य होय. परंतु समाजकार्य करणारा माणूस बेकारच असावा लागतो असे काही नाही. चांगली नोकरी करणारा माणूसही आपल्या कामातून वेळ काढून लोकांसाठी काहीतरी करत असेल तर तेही समाजकार्यच असते. बंगळुरु शहरामध्ये सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले अतीशय व्यग्र असणारे काही अधिकारी असे आहेत की एवढे व्यग्र असूनही ते आठवड्यातले चार तास समाजासाठी देतात. अशा काही लोकांनी बंगळुरु शहरातल्या भुकेल्या लोकांना महिन्यातून एका रविवारी तरी छान, गरम, ताजे, स्वादिष्ट आणि पोषणमूल्य असलेले अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

त्यांनी यासाठी काही वेगळे केलेले नाही. त्यांनी घरोघर जाऊन महिन्यातल्या एका रविवारी त्या घरातल्या लोकांनी स्वतःसाठी अन्न शिजवताना एका माणसाचे जेवण अधिक शिजवावे असे आवाहन केले. हे जादा शिजवलेले अन्न त्यांनी पॅक करून द्यावे. ते अन्न कार्यकर्ते गोळा करतील आणि शहरातल्या गरीब लोकांना वाटतील. या कामाची सुरूवात हर्षिल मित्तल या इंजिनिअरने केली. आपल्या वस्तीतील घराघरात जाऊन त्याने रविवारी असे अन्न गोळा केले आणि एका विशिष्ट चौकात गरजू लोकांना त्याचे वाटप केले. रविवारी दुपारच्या वेळी चांगले जेवण मिळते हे गरीब मुलांना, अनाथ मुलांना कळायला लागले तसे तिथे येणार्‍यांची गर्दी वाढायला लागली आणि जेवणाच्या अधिक डब्ब्यांची गरज भासायला लागली. पण दरम्यान जेवण तयार करून देणार्‍यांचाही प्रतिसाद वाढत चालला.

आता दहा हजार घरांमध्ये असे अन्न शिजवून दिले जाते आणि त्यांचे संकलन आणि वाटप साडेसातशे कार्यकर्त्यांकडून केले जाते. या अन्नावर निदान रविवारी तरी २० हजार लोकांना चांगले जेवण मिळते. हर्षिल मित्तल यांनी या उपक्रमासाठी ज्या कुटुंबाशी संपर्क साधला त्यापैकी ९० टक्के कुटुंबांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. १० टक्के कुटुंबातून नकार आला ही गोष्ट खरी पण त्यामागची कारणे वेगळी होती. त्या कुटुंबांमधून संपन्नता होती परंतु तांत्रिक कारणामुळे ते अन्न शिजवून देऊ शकत नव्हते. ज्या लोकांनी प्रतिसाद दिला. त्यांनी केवळ अन्नच दिले असे नाही तर त्यातल्या काही लोकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचेही कबूल केले. अशा रितीने बंगळुरुमध्ये आता हा लेटस् फीड बंगळुरु हा उपक्रम जारी आहे.

(बेटर इंडियावरून साभार)

Leave a Comment