देवमाळी गावातील सर्व जमीनीवर नारायणाची मालकी

devmali
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील ८० उंबर्‍यांचे गांव देवमाळी अनोख्या कारण्याने प्रसिद्ध आहे. या गावातील सर्व जमिनीवर नारायणाची मालकी आहे आणि या गावात एकही पक्के घर नाही. येथील सर्व जमीन देव नारायण यांच्या नावाने नोंदली गेलेली आहे. येथे बांधकाम करताना लोखंड अथवा काँक्रीटचा वापर केला जात नाही त्यामुळे या गावातील सर्व घरे कच्ची आहेत.

येथे अशी कथा सांगितली जाते की, भगवान नारायण या गावात आले व त्यांच्यासाठी पक्के मंदिर बांधायची आज्ञा त्यांनी गावकर्‍यांना केली. त्या प्रमाणे नारायणाचे काँक्रीट मधले मंदिर बांधले गेले खरे पण देवाचा मान राखायचा म्हणून पक्की घरे मात्र बांधली गेली नाहीत. आजही कोणी पक्के घर बांधायचा प्रयत्न केलाच तर वर्षाच्या आत ते घर कोसळते. आजही या गावात बहुतेक घरात चुलीवर अन्न शिजविले जाते. फारच थोड्या घरात वीज आहे. येथे कितीही उकाडा असला तरी कूलर वापरला जात नाही. घरांना दारे नाहीत त्यामुळे कुलपेही नाहीत.

या गावातील नागरिक देवाने घालून दिलेले नियम पाळतात व युवकांनाही ते मोडण्याची परवानगी नाही. गावात कुणीही दारू पित नाही अथवा मांसाहार करत नाही. पोलिसांकडच्या ५० वर्षांच्या रेकॉर्डमध्ये येथे एकही चोरी अथवा लूटालुटीची घटना घडलेली नाही.

Leave a Comment