तंबाखूचा विळखा

tobacco
दारू आणि तंबाखू ही दोन्ही व्यसनेच आहेत. परंतु दारूपेक्षा सिगारेटचे व्यसन कमी खर्चाचे, सहज उपलब्ध आणि दारूच्या मानाने अधिक समाजमान्य आहे. त्यामुळे पौगंडावस्थेतील मुले सिगारेट, विडी किंवा तंबाखू यांच्या सहज आहारी जाऊ शकतात. एकेवर्षी भारतामध्ये एका सिगारेट कंपनीने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा प्रायोजित केली होती. या स्पर्धेनंतर या प्रायोजित कंपनीच्या जाहिरातीचा खरोखर काय परिणाम झाला आहे याचा अंदाज घेतला तेव्हा असे लक्षात आले की दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील हजारो मुलांनी या स्पर्धेच्या दरम्यानच आपल्या आयुष्यातला पहिला झुरका घेतलेला होता. झुरका आणि घुटका यामध्ये एक साम्य आहे. एकदा पहिला घुटका घेतला की माणूस सहजच तळीराम होऊन जातो. जन्मभर ते व्यसन सुटत नाही. झुरक्याचेही असेच आहे. दारू पिलेला माणूस बरळतो त्याचा जिभेवरचा आणि मेंदूवरचा ताबा सुटतो. क्वचित काही मद्यपी गटारातही लोळतात. त्यामुळे दारूचे व्यसन वाईट समजले जाते. परंतु सिगारेट ओढणारा किंवा तंबाखू खाणारा माणूस असे काही करत नाही. त्यामुळे लोकांचा असा समज होतो की तंबाखूचे व्यसन काही दारूएवढे वाईट नव्हे.

वरकरणी असे वाटत असले तरी प्रत्यक्षात दारूच्या आणि तंबाखूच्या व्यसनात फार फरक नाही. कारण शरीराची आणि आरोग्याची होणारी नासाडी या दोन्ही व्यसनात सारखीच आहे. किंबहुना तंबाखूने होणारी नासाडी दारूपेक्षा जास्त आहे. दारूने होणार्‍या नासाडीत जे रोग जडतात त्यावर औषध घेता येते तसे सिगारेटचे नाही. सिगारेटने कर्करोग होतो आणि कर्करोगावर औषध नाही. एक गोष्ट दुर्दैवाची अशी की तंबाखूच्या व्यसनाने एवढी नासाडी होत असते तरीही तेच व्यसन सहजपणे लागते. दारूचे व्यसन एवढ्या सहजतेने लागत नाही. दोन्ही व्यसने वाईट परंतु तंबाखूचे व्यसन तरुण पिढीसाठी फारच वाईट. आज सार्‍या जगामध्ये तंबाखू विरोधी दिन पाळला जात आहे. अमेरिका आणि चीन हे दोन देश तंबाखूच्या सिगारेटच्या माध्यमातून होणार्‍या वापराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. चीनमध्ये दर दोन पुरुषांमागे एकजण सिगारेट ओढणारा आहे. अमेरिकेत हे प्रमाण एवढे मोठे नसले तरी अमेरिकेतल्या महिला पुरुषांच्या बरोबरीने सिगारेट ओढतात आणि महिलांच्यामध्ये सिगारेटचा प्रतिकार करण्याची शक्ती कमी असल्यामुळे त्या सिगारेटला लवकर आणि तीव्रतेने बळी पडतात. तेव्हा अमेरिकेमध्ये सिगारेट ओढणार्‍यांची संख्या चीनपेक्षा कमी असली तरी सिगारेटने मरणार्‍यांची संख्या जास्त आहे.

भारतामध्ये वेगळाच प्रकार आहे. भारतातला तंबाखूचा वापरला सिगारेट, बिडी, जर्दा, गुटखा, मिश्री, तपकीर असा अनेक प्रकारांनी केला जातो. म्हणजे भारतात अमेरिकेपेक्षा आणि चीनपेक्षा व्यसनी लोक कमी आहेत पण व्यसनाचे प्रकार अनेक आहेत. असा तीन देशांतला फरक असला तरी भारतामध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि अमेरिका, चीन यांच्यामध्ये ते कमी होत आहे. म्हणजे जगभरच तंबाखूच्या वापराबाबत जी एक मोहीम सुरू आहे तिला चीनी आणि अमेरिकी लोक प्रतिसाद देत आहेत. पण भारतीय लोक मात्र अशा प्रचाराला आणि मोहिमांना भीक घालत नाहीत. त्यामुळे तंबाखूच्या वापराने कर्करोग होऊन मरणार्‍यांचे प्रमाण भारतात जगात सर्वाधिक आहे आणि भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतातले व्यसनाचे प्रमाणे केवळ वाढतच आहे असे नाही तर देशातला तरुण मुलगा सहजपणे अशा व्यसनाला बळी पडावा असे अनुकूल वातावरण भारतात तयार झालेले आहे आणि होत आहे. भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास कायद्याने मनाई आहे. या मनाईचा काहीसा परिणाम शहरातल्या सार्वजनिक ठिकाणांवर झालेला आहे.

आता सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयांमध्ये कोणीही बिनदिक्कतपणे सिगारेट, विडी ओढत नाही. तिथे असे उघडपणे व्यसन करणार्‍यांना दंड ठोठावला जाण्याची शक्यता असते. मात्र ग्रामीण भागामध्ये आणि बिन गर्दीच्या ठिकाणी हे बंधन कोणी पाळत नाही. तंबाखूचे व्यसन आपल्या देशात एवढे उघडपणे केले जाते की ते व्यसन आहे आणि ते वाईट आहे असे लहान मुलांना वाटतच नाही. जितक्या उघडपणे आपण चहा, कॉफी पितो तेवढ्या उघडपणे कित्येक कुटुंबांमध्ये सिगारेट, विडी, तंबाखू यांची देवाणघेवाण केली जाते. लहान मुले हा सारा प्रकार बघतात आणि त्यांनाही थोडे मोठे झाल्यावर आपण तंबाखू खायला काही हरकत नाही असे वाटायला लागते. ग्रामीण भागात अशी कित्येक कुटुंबे आहेत की ज्या कुटुंबात मुले दहावी किंवा अकरावीला गेली की तंबाखू खायला सुरूवात करतात. खरे तर ही सुरूवात काही मोठ्या गरजेपोटी किंवा निरुपायाने झालेली नसतात. सगळेच लोक तंबाखू खातात तेव्हा आपण वयाने वाढलो की तंबाखू खायला काही हरकत नाही. असे ते समजून चालतात आणि एकदा अशा काही गैरसमजाने तंबाखूची चटक लागली की ती मग जन्मभर सुटत नाही. अशी मुले तंबाखू खायला लागतात तेव्हा त्यांचे पालकही त्यांना हटकत नाहीत. आपला मुलगा मोठा झाला म्हणजे तंबाखू खाणारच असे तेही मानत असतात. परिणामी कोणत्याही बाजूने अटकाव नसल्याने मुले भराभर तंबाखूच्या कसल्याना कसल्या व्यसनाला बळी पडायला लागतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment