गरीब विद्यार्थ्यांना विनाशुल्क मार्गदर्शन

better-india
अहमदाबादचे प्राध्यापक हिदायत सय्यद हे स्पर्धात्मक परीक्षांना मार्गदर्शन करणारे एक शिक्षक आहेत. सध्या देशामध्ये अशा परीक्षांचे आणि त्यासाठीच्या मार्गदर्शक वर्गांची मोठी क्रेझ तयार झालेली आहे आणि अशा प्रकारचा वर्ग सुरू करून कित्येक मार्गदर्शक लाखोच नव्हेतर करोडो रुपयांची कमाई करत आहेत. परंतु हिदायत सय्यद यांचे वैशिष्ट्य असे की ते कोणाकडूनही एकही पैसा न घेता वर्ग चालवतात. गरीब विद्यार्थ्यांकडे बुध्दीमत्ता असूनसुध्दा मार्गदर्शन नसल्यामुळे ते विद्यार्थी मागे पडतात. म्हणून त्यांनी हा क्लास सुरू केलेला आहे आणि तो गरीब विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे ते कोणाला फी आकारत नाहीत. त्यांच्या क्लासच्या नाव सरोवर एज्युकेशन सोसायटी असे आहे.

२००६ साली त्यांनी ही संस्था सुरू केली. त्यांना स्वतःलाच अशा परीक्षेला बसून मार्गदर्शन नसल्यामुळे नापास व्हावे लागले होते. म्हणून त्यांनी हा क्लास सुरू केला. आपण विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहोत असे कर्णोपकर्णी पसरले आणि २४ विद्यार्थी त्यांच्याकडे आले. हे सर्व विद्यार्थी गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसले होते. त्यातले १८ विद्यार्थी पहिल्या परीक्षेत पास झाले आणि त्यातला एक विद्यार्थी अंतिम परीक्षेत पास होऊन अधिकारी झाला.

२००८ सालपासून त्यांनी अधिकृतपणे एक जागा भाड्याने घेऊन संस्थेची नोंदणी करून क्लास सुरू केला. आता सध्या त्यांच्या क्लासच्या तेरा शाखा गुजरातभर सुरू झाल्या आहेत आणि त्यातून १ हजार विद्यार्थी विनामूल्य प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी कोणाकडूनही फी न घेण्याचा वसा कायम टिकवला आहे. त्यामुळे त्यांचेच काही विद्यार्थी मार्गदर्शक म्हणून या क्लासमध्ये येतात आणि पैसे न घेता शिकवतात. अशा रितीने त्यांचा हाही पैसा वाचतो.

त्यांच्या वर्गामध्ये मुली मोठ्या संख्येने आहेत. ६० टक्के मुली आणि ४० टक्के मुले आहेत. त्यातल्या काही मुली गुजरातच्या विविध भागातील शासकीय नोकरीत वरच्या पदावर कार्य करत आहेत. असे माजी विद्यार्थी स्वतःहून नोकरी लागल्यानंतर संस्थेला देणगी देतात किंवा पुस्तके दान करतात. त्यातून पुस्तकांचे खर्च भागतात. स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन करून लाखो रुपयांची कमाई करण्याची संधी असतानाही प्रोफेसर सय्यद हे विनामूल्य शिकवतात. त्यांच्या दृष्टीने त्यांची ही समाजसेवाच आहे.

(बेटर इंडियाच्या सौजन्याने)

Leave a Comment