अकाली पांढर्‍या केसांपासून अशी मिळवा सुटका

hair1
पूर्वी वृद्धत्व जवळ येऊ लागल्याची खूण म्हणून पांढर्‍या केसांकडे पाहिले जायचे. मात्र आजकाल तरूण वयात व कित्येकदा शालेय वयातील मुलामुलींचेही केस पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, चिंता, आहारातील बदल, अनुवंशिकता अशी अनेक कारणे दिली जातात. पांढरे केस काळे करण्यासाठी कलर करणे हा सोपा उपाय असला तरी तरूणवयापासून कलप किंवा केस रंगविण्याचे अनेक घातक परिणाम पुढच्या आयुष्यात भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी कांही सोपे उपाय आहेत व विशेष म्हणजे घरातील पदार्थ वापरूनच हे उपाय करता येतात. कोणते आहेत हे उपाय?

आवळा- केसांसाठी प्राचीन काळापासून आवळ्याचा उपयोग केला जात आहे. केस निरोगी व काळे राखण्यात आवळा फार उपयुक्त आहे व त्यामुळेच अनेक शांपू, केस तेलांत त्याचा उपयोग केलेला दिसतो. खोबरेल तेलात आवळ्याचे तुकडे घालून ते उकळवावे हे तुकडे काळे पडून त्याला काळा रंग आला की हे तेल केसांच्या मुळाशी चोळून लावावे व थोडया वेळानंतर केस धुवावेत. आवळ्याचा रस केसाच्या मुळांशी चोळून थोड्या वेळानंतर केस धुतले तरी पांढरे केस होण्याचे प्रमाण कमी करता येते.

२)कांदा- कांद्याचा वापरही फार पूर्वीपासून केसाच्या आरोग्यासाठी केला जात आहे. गळणारे केस थांबविण्यासाठीही कांदा उपयुक्त आहे. कांद्यातील कांही द्रव्ये केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात. कच्चा कांदा डोक्यावर चोळणे अथवा कांद्याचा रस काढून केसांना चोळणे व थोडयावेळानंतर केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास केस गळती कमी होतेच पण केस पांढरे होण्याचे प्रमाणही कमी होते.

hair
३)हिना – मेंदी- हिना म्हणजे मेंदी. मेंदीचा केसांसाठी वापरही कित्येक वर्षे केला जात आहे. केसांना चमकदारपणा देण्याबरोबरच केस गळती कमी करणे व पांढर्‍या केसांचे प्रमाण कमी होण्यासाठी मेंदी अतिशय उपयुक्त आहे. केसांना मेंदी लावताना थोडा लिंबू रसही त्यात घालावा. हे मिश्रण केसांच्या मुळांशी तासभर लावून ठेवावे व मग सौम्य शांपूने केस धूवावेत.

४) मेथ्या – मेथ्या या एकूणच सर्व शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत. पिण्याच्या पाण्यात मेथीचे दाणे घालून ते पाणी उकळावे व असे एक ग्लास पाणी पिण्याने केसांसह सर्व शरीराचे आरोग्य चांगले राहते. मेथ्यांचे दाणे पाण्यात वाटून केसांच्या मुळाशी चोळून लावावे व थोड्या वेळानंतर केस धुवावेत. केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होईल.

५)तीळ – केसांच्या व हाडांच्या आरोग्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर ठरतात. तीळ वाटून ते बदामच्या तेलात मिसळावेत व हे मिश्रण डोक्याला हलक्या हाताने चोळून लावावे. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. केस घनदाट व काळे होण्यास मदत होते. हे सारे उपाय घरच्याघरी करता येतात मात्र ते कांही महिने सातत्याने करावे लागतात. कोणताही साईड इफेक्ट न होता केसांचे आरोग्य यामुळे सुधारता येते.

Leave a Comment