रेल्वेचे तिकीट काढा अन् विमानाने प्रवास करा

air-india
नवी दिल्ली – तुम्ही रेल्वेने जर प्रवास करणार असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म होत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमची वाट एअर इंडियाचे विमान पहात आहे. जर तुमच्याकडे वातानुकुलित प्रथम दर्जाचे तिकीट असेल तर विमान प्रवासासाठी तुम्हाला एक रुपयाही ज्यादा देण्याची गरज नाही. तुम्ही त्याच पैशातून रेल्वेच्या आधी तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.

जर तुमच्याकडे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसी टू टायर दर्जाचे तिकीट असेल तर तुम्हाला १५०० ते २००० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. मात्र यासाठी तुमच्याकडे आयआरसीटीसीचे ऑनलाइन तिकीट अनिवार्य आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एअर इंडिया आणि आयआरसीटीसीने एक करार केला आहे. एअर इंडियाचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी लोहानी आणि आयआरसीटीसीचे चेअरमन डॉ. एके मनोचा यांनी सांगितले की, एअर इंडियाने ऑनलाईन तिकीटे विकणाऱ्या आयआरसीटीसी बरोबर एक करार केला आहे. त्या अंतर्गत ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना लोहानी यांनी सांगितले की, एखाद्या प्रवाशाला जर रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर त्याला पुढच्या २४ तासांच्या आत एअर इंडियाचे विमान बुक करण्याचा पर्याय दिला जाईल. प्रवाशांना यासाठी रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास तिकीटाइतके भाडे द्यावे लागेल. एसी सेकंड क्लासच्या प्रवाशांना रेल्वे तिकीटाशिवाय १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. हि सेवा पहिल्यांदा राजधानी रेल्वे गाड्यांसाठी सुरू करण्यात येईल.

भारतीय रेल्वेच्या वेबसाईटनुसार, मुंबई राजधानी एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या एसी फर्स्ट क्लासचे तिकीट ४७५० रुपये आहे. तर राजधानी एक्सप्रेसच्या एसी सेकेंड क्लासचे तिकीटभाडे २८६५ रुपये आहे. त्यानंतरही जर प्रवाशाला रेल्वेचे कन्फर्म बुकींग मिळाली नाही तर संबंधित प्रवासी तिकिटाच्या अतिरिक्त दीड हजार रुपये देऊन एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करु शकतो. एअर इंडियाची फ्लाईट २४ तासांच्या आत उपलब्ध केली जाईल.

Leave a Comment