नवी दिल्ली – अखेर सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेखालील (ईडीएलआय) विमा संरक्षणाची रक्कम सहा लाख रुपये करण्याचा प्रस्ताव स्वीकारला असून ४ कोटी सदस्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
६ लाख रुपयांचे विमा कवच देणार ‘ईपीएफओ’
तीन लाख साठ हजार रुपये इतकी सध्या ही रक्कम आहे. ती वाढवण्याचा निर्णय गेल्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात घेण्यात आला होता. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे पडून असल्याने त्याबाबतची अंमलबजावणी करता आली नव्हती. ईडीएलआयची रक्कम वाढविण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही रक्कम तीन लाख साठ हजारांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली आल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली. राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या (एनएटीआरएसएस) आधुनिकीकरण योजनेच्या सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे नामांतर पंडीत दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था असे करण्यात आले.
शिवाय, गेल्या आर्थिक वर्षाकरिता पीएफ रकमेवर ८.८ टक्के दराने व्याज देण्याची अधिसूचनादेखील जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतू कार्यक्रमात उपस्थित संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी अशी सूचना न मिळाल्याचे सांगितले. अजूनही ८.७५ टक्के दराने दावे निकाली निघत असल्याचे त्यांनी सांगितले.