पुणे- वाहन चोरीला गेल्यानंतर नागरिकांना आता पोलिस ठाण्यात जाण्याची गरज लागणार नाही. कारण, यापुढे राज्यातील नागरिक घर बसल्या त्यांचे वाहन चोरीला गेल्याची तक्रार देऊ शकणार आहेत. तक्रारीसाठी पोलिसांनी खास मोबाईल अॅप तयार केले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
वाहन चोरीची तक्रार आता द्या ‘अॅप’वर
वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून चोरीला गेलेल्या वाहनांची माहिती संकलित करण्याची व वाहन चोरीचे गुन्ह्यांची उकल, बिनधनी वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक होते. पोलिस दलात नवनवीन स्मार्ट प्रणालीचा वापर सुरु करण्यावर पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत यांनी भर दिला आहे. किरकोळ कामासांठी नागरिकांना पोलिस ठाण्यापर्यंत यावे लागू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीने वाहन चोरीची तक्रार देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमध्ये आरटीओची लिंक ही असणार आहे. त्यामुळे राज्यातील गाड्यांची माहिती मिळेल. प्रत्येक जिल्हा व पोलिस आयुक्तालयास एक युझर आयडी, पासवर्ड देण्यात आला आहे. तक्रारदाराने वाहन चोराची नोंद केल्यानंतर ही माहिती सायबर पोलिसांकडे येईल. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार पाठवली जाईल. स्थानिक पोलीस ही माहिती घेतील. तक्रारादाराला संपर्क साधून पोलीस त्याच्याकडे जाऊन आणखी काही माहिती घेतील. त्या तक्रारदाराची सही घेतील. त्यानंतर गुन्हा दाखल होईल. यासाठी पुणे पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अॅप उघडल्यास पब्लिक हे ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा. त्याठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक, नाव, ईमेल आयडी आणि एक पासवर्ड टाका. त्यानंतर तुमच्या इमेलवर किंवा मोबाईल क्रमांकवर ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर दुसरा फॉर्म येईल, त्यामध्ये तुमच्या गाडीचा क्रमांक, गाडी कोणाच्या नावावर आहे, चीसी क्रमाक व गाडी कोठून चोरीला गेली याची माहिती भरुन सबमिट करा.