नवी दिल्ली : सर्वत्र स्मार्टफोनचा वापर वाढला असून, भारतातील तब्बल ९४.८ टक्के अँड्रॉईड मोबाईल युजर्सकडे व्हॉटस्अॅप आहे. ही मंडळी दररोज सरासरी ३७ मिनिटे या अॅपचा वापर करतात, अशी माहिती सिमिलर वेबने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे जगातील १८७ देशांपैकी १०९ देशांत व्हॉटसअॅपचा वापर होत असल्याने व्हॉटस्अॅप जगातील पहिल्या क्रमांकाचे मॅसेंजिग अॅप ठरले असल्याचेही सांगण्यात आले.
देशातील ९४ टक्के मोबाईल्सवर व्हॉटस्अॅप
सोशल मीडियाचा अलिकडच्या काळात वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यात मॅसेंजर अॅपने आघाडी घेतली आहे. व्हॉटस्अॅपने तर अगदी कमी कालावधीत मोठी झेप घेतल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि अॅप्सची लोकप्रियता याचा विचार करून जगातील किती लोक व्हॉटस्अॅपचा वापर करता आणि त्यासाठी नेमका किती वेळ दिला जातो, याचा अभ्यास करण्यासाठी सिमिलर वेब या डिजिटल मार्केट इंटेलिजन्स फर्मने जगातील १८७ देशांत सर्वेक्षण केले. यातून धक्कादायक बाब पुढे आली आहे. म्हणजेच १८७ देशांपैकी १०९ देशांत व्हॉटस्अॅपचा वापर होत असून, अर्धे जग याचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. भारतातही त्याचा वापर अधिक आहे. तब्बल ९४.८ टक्के लोकांनी व्हॉटस्अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले आहे.
ही मंडळी दररोज ३७ मिनिटे, ४७ सेकंद व्हॉटस्अॅपचा वापर करतात, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भारतासोबतच आशिया खंडातील अनेक देश, तसेच ब्राझिल, मेक्सिको, ब्रिटन, रशिया आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांत मोबाईलधारक व्हॉटस्अॅपचा वापर करतात. त्यामुळे व्हॉटस्अॅपची लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज येतो. त्याच्यानंतर फेसबुकचा दुसरा क्रमांक असून, जगातील ४९ देशांत त्याचा वापर केला जातो. त्यानंतर वायबर या मॅसेंजर्सचा क्रमांक लागतो. हे अॅप पूर्व युरोपात अधिक प्रमाणात वापरले जाते.