तरंगत्या खांबाचे लेपाक्षी मंदिर

lepakshi
भारतात विविध प्रकारे बांधकाम केलेल्या अनेक प्राचीन इमारती, मंदिरे पाहायला मिळतात. विज्ञानाचा अतिशय चातुर्याने केलेला उपयोग हे त्यांचे वैशिष्ट. मात्र आजही यामागे नक्की काय सायन्स असावे हे समजू शकलेले नाही अशाही अनेक वास्तू भारतात आहेत. आंध्रातील लेपाक्षी मंदिर यात अग्रणी आहे. १६ व्या शतकातले हे मंदिर. यात अनेक दगडी वजनदार, भले मोठे खांब आहेत. मात्र त्यातील एक खांब अधांतरी लटकलेला आहे. म्हणजे तो जमिनीवर टेकलेला नाही तसेच वरूनही त्याला कोणताही आधार दिला गेलेला नाही. पूर्वी ब्रिटीशांनी यामागचे रहस्य शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आजही हे रहस्य उलगडले गेलेले नाही.

वनवासात असताना राम, सीता व लक्ष्मण येथे आले होते असा समज आहे. इतकेच नव्हे तर सीताहरण करून रावण लंकेला जात असताना वाटेत जटायूने त्याला येथेच रोखले होते व या युद्धात जखमी झालेला जटायू येथेच पडला होता असेही सांगितले जाते. रामाने सीता शोधात येथे आल्यावर जटायूला गळाभेट दिली आणि ले पाक्षी असे सांगितले. या तेलगू शब्दाचा अर्थ आहे पक्ष्या उठ असा. त्यावरूनच या मंदिराला हे नांव पडले अशी या मंदिराची कथा आहे.

इतिहासकारांच्या मतानुसार विजयनगरचे राजे बंधू विरूपन्ना व वीरण्ण यांनी हे मंदिर बांधले तर कांही जणांच्या मते अगस्ती ऋषींनी हे मंदिर बांधले. भगवान शिव, विष्णु व वीरभद्र यांनी तीन मंदिरे या संकुलात आहेत. तसेच येथे नागलिंगाची मोठी प्रतिमा असून ही भारतातील सर्वात मोठी प्रतिमा असल्याचेही सांगितले जाते. या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असतेच पण भाविक या मंदिरातील लटकत्या खांबाखालून कपडा व अन्य वस्तू सरकवून बाहेर काढतात. असे करणे अत्यंत शुभ समजले जाते.

Leave a Comment