मोदींच्या दोन वर्षात अदानी-अंबानींना ६० हजार कोटींचे नुकसान

modi
नवी दिल्ली – २६ मे रोजी व्यवसाय समुदायासाठी उत्तम समजल्या जाणा-या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होणार असून दोन वर्षातील कंपन्यांचे बाजार मूल्यांकन केल्यानंतर जी माहिती समोर आली आहे, ती डोळे विस्फारून टाकणारी आहे. या दरम्यान तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे नुकसान मोदींच्या सगळ्यात जवळचे समजले जाणारे प्रसिद्ध व्यावसायिक अंबानी-अदानी यांचे झाले आहे. तर याच दरम्यान टाटा ग्रुपला ६८ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

अदानी ग्रुपचे मागील दोन वर्षामध्ये बाजारातील मूल्य ५१ टक्के, मुकेश अंबानी ग्रुपचे १५ टक्के आणि अनिल अंबानी यांचे बाजारातील मूल्य ४४ टक्क्यांनी खाली घसरले आहे. तर टाटा ग्रुपच्या बाजारातील मूल्यामध्ये १० टक्के आणि सुनील भारती मित्तलच्या भारती एअरटेल बाजारमूल्यामध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअरबाजाराने या दोन वर्षामध्ये गुंतवणूकदारांना दोन टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. मागील दोन वर्षामध्ये सेन्सेक्समधील ३० कंपन्यांमधील ७ कंपन्यांचे पैसे जरी बुडाले असले तरी २३ कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. क्रूड ऑईलमध्ये सुरू असलेल्या घसरणीचा फायदा एशिएन पेंट्सला मोठय़ा प्रमाणात झाला असून, कंपनीचे समभाग दोन वर्षात दुप्पट झाले आहेत. मोदी सरकारकडून देशातील अनेक कंपन्यांना मोठी आशा होती. त्यामुळे सुरुवातीला कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमोडिटीच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने अंबानी, अदानी, वेदांता या सारख्या कंपन्यांना नुकसान झाले आहे, असे क्रिस रिसर्चचे सीईओ अरुण केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment