१० हजार कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया

nokiya
हेलसिंकी- जगभरात दहा हजार नोक-यांमध्ये टेलिकॉम महाकंपनी नोकिया कपात करण्याची शक्यता असल्याचे फिनिश कामगार संघटना प्रतिनिधीनी सांगितले आहे. नोकियाने अल्काटेल ल्यूसंटचे टेकओव्हर केल्यापासून काटकसरीची उपाययोजना सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून नोकरकपात केली जाणार आहे.

२०१८ पर्यंत परिचालनाच्या खर्चात ९० कोटी युरोने कपात करण्याचे उद्दिष्ट नोकियाने ठेवले आहे. मात्र नक्की किती रोजगार बंद होणार, याची आकडेवारी कंपनीने दिली नाही. कामगार संघटनेचा प्रतिनिधी रिस्टो लेहतीलाहती म्हणाला की, आमच्याकडे अधिकृत आकडा नाही परंतु आमच्या संघटना संबंधांतून मिळालेल्या माहितीनुसार जगभरात १० ते १५,००० नोक-या बंद केल्या जातील, असे दिसते.

मात्र या आकडय़ावर नोकियाच्या प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार दिला. जगभरात नोकियाचे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. गेल्या आठवडय़ात कंपनीने मायदेशातील म्हणजे फिनलंडमधील १,००० नोक-या बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. जर्मनीतील १,४०० नोक-या कायमच्या बंद करण्याकडे आम्ही पाहत आहोत, असेही कंपनीने सांगितले होते. फ्रान्समध्ये कंपनी ४०० नोक-या कमी करणार असली तरीही ५०० संशोधन व विकास खात्यात पदे निर्माण करणार आहे.

कंपनी प्रवक्त्याने मात्र जर्मनी अथवा फ्रान्सबाबत आमच्याकडे काहीही ताजी माहिती नसल्याचे सांगितले. तपशील देण्यासही त्याने नकार दिला. ३० देशांतील कर्मचारी संघटनांशी नोकिया बोलणी करत आहे. फिनलंडमध्ये नोकियाने आतापर्यंत हजारो नोक-या कमी केल्या आहेत. एकेकाळी व्यवसायात वर्चस्व असलेल्या नोकियाला स्मार्टफोन्सची तगडी स्पर्धा झाल्याने नोकियाच्या व्यवसायात चांगलीच घट झाली आहे.

Leave a Comment