जलसंपदा विभागाची दुष्काळ निवारणासाठी मदत

drought
मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीला जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी दुष्काळ निवारणासाठी ३.३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या आवाहनास विभागाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमुळे राज्यात ब-याच भागात अभुतपूर्व पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चा-याचा प्रश्न देखील गंभीर आहे. शासन विविध माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने दुष्काळ निवारणास हातभार लागावा या हेतूने जलसंपदा मंत्री महाजन यांनी त्यांचे १ महिन्याचे संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे. या शिवाय जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सामाजिक जाणिवेतून दुष्काळ निधी उभारण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांनी पत्राद्वारे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून विभागामार्फत सर्व ५ क्षेत्रीय पाटबंधारे विकास महामंडळ, वाल्मी, मेरी, जलविज्ञान, यांत्रिकी विभाग, विद्युत विभाग तसेच मंत्रालय व मंत्री (आस्थापना) अधिकारी कर्मचा-यांमार्फत दुष्काळ निवारणार्थ आपले १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीकरिता एकूण सुमारे ३,३०,२३,४६९ रूपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.