२०, ५० च्या नोटा आता एटीएममधून मिळणार

atm
नवी दिल्ली : ग्रामीण क्षेत्रांमध्ये छोट्या गुंतवणूकदारांना बँकांशी जोडण्यासाठी २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा असलेल्या एटीएम मशिन्स बसविण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था सुलभ करण्यासाठी घेतला आहे. याबाबत आवश्यक ती दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने बँकांना योग्य ती पावले उचलण्याचा आदेश दिला आहे. बँकांकडून येणा-या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एटीएम मशिन बसविण्यासाठी येणा-या खर्चापैकी ५० टक्के रक्कम रिझव्र्ह बँक देणार आहे. ग्रामीण भागातील छोट्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे रिझर्व्ह बँकेचे मुजफ्फरपूरचे क्षेत्रीय संचालक मनोज कुमार वर्मा यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील सामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून देण्यात याव्यात त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होणार नाही. गतवर्षी छत्तीसगडच्या रायपूर येथील भारतीय स्टेट बँकेने एटीएममधून ५० रुपयांच्या नोटा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून देण्याचे सांगितले होते.

त्या वेळी बँकांनी विरोध करीत ही बाब अशक्य असल्याचे म्हटले होते. मात्र ग्रामीण भागात बँकिंग सुविधा सुलभ व्हावी आणि लहान गुंतवणूकदारांना बँकांशी जोडून घेता यावे, या उद्देशाने रिझव्र्ह बँकेने आता २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून देण्यात याव्यात, असा निर्णय घेतला आहे. बँकेची सर्व कामे आता एका एटीएमद्वारे करता येणार आहेत त्यामुळे बँकांची कामे करायला बँकेत जावे लागणार नाही. एटीएमद्वारे बँकिंग सुविधा देण्याची परवानगी या आधीच रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे त्यामुळे कर्जासाठी आवेदन करणे, ड्राफ्ट बनविणे, रेल्वे तिकिट, वीज किंवा पाणी बिल भरणे ही सर्व कामे एटीएमद्वारे करता येणार आहेत.

Leave a Comment