अॅपलचा आगामी आयफोन एट २०१७ मध्ये येणार असून हा फोन पूर्णपणे ग्लास बॉडीचा असेल असे सांगितले जात आहे. स्मार्टफोन बाजारात नव्या आयफोन लॉचिंगसंदर्भात जितक्या बातम्या येतात तेवढ्या अन्य कोणत्याच स्मार्टफोनबाबत येत नाहीत. केजेआय सिक्युरिटीचे प्रसिद्ध विश्लेषक मिग ची कुओ यांनी आयफोन एट कसा असेल याचे अंदाज व्यक्त केले आहेत.
पूर्ण ग्लास बॉडीसह येणार आयफोन ८?
त्यांच्या म्हणण्यानुसार आयफोन एट पूर्ण पणे ग्लास बॉडीपासून बनविला जाईल व त्याला आयपीएस एलसीडी पॅनलच्या जागी प्रथमच अमोलेड स्क्रीन दिला जाईल. याचे कारण म्हणजे पूर्ण ग्लास बॉडीमुळे फोनचे वजन वाढणार असल्याने अमोलेड स्क्रीन हाच त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे. ऑल ग्लास बॉडीमुळे या फोनला नवा लूक मिळेल व अन्य प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अॅपल एक पाऊल पुढेही जाईल. सॅमसंगने नुकताच त्यांच्या गॅलेक्सी एस सेव्हन व एस सेव्हन एज साठी ग्लास बॅक दिली आहे. त्याला उत्तर म्हणून आयफोन पूर्ण ग्लास बॉडीचा असेल.
अॅपल आयफोनची या वर्षात विक्री घटली आहे व त्यामुळे विक्रीत वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांना नवीन कांही तरी देणे भाग आहे. हार्डवेअर डिझाईनमधील बदल त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. आजपर्यंत अॅपल दर दोन वर्षांनी हार्डवेअर अपग्रेड करत आले आहे मात्र आता दर वर्षालाच हे अपग्रेडेशन केले जाईल असाही जाणकारांचा अंदाज आहे.