नावांचा वाद

mayawati
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले स्वतःचे आणि आपले गुरु कांशिराम यांचे जागोजाग पुतळे बसवून घेतले तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. खरे म्हणजे मायावतींच्या पुतळ्यांचा अतिरेक तर चुकीचा होताच परंतु त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाही. कारण कॉंग्रेसनेसुध्दा गेल्या ६० वर्षात विविध योजना, नावे, चौक, रस्ते यांना गांधी-नेहरु घराण्यातील व्यक्तींची नावे देण्याचा अतिरेकच केलेला आहे. चित्रपट अभिनेता ऋषीकपूर यांनी या संबंधात मर्मावर बोट ठेवले आहे. त्याने कॉंग्रेसच्या लोकांनी अशी नावे देताना गांधी आणि नेहरु घराण्यालाच कसे जास्त महत्त्व दिले याची काही उदाहरणे पेश केली.

यावर कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी या अतिरेकाचे समर्थन केले आणि गांधी-नेहरु घराण्याच्या नेत्यांनी त्याग केलेला असल्यामुळे त्यांची नावे देण्यात काही चूक नाही असे प्रतिपादन केले. खरे म्हणजे देशासाठी रक्त सांडण्यामध्ये केवळ गांधी-नेहरु घराणेच होते असे काही नाही. इतरही अनेकांनी देशासाठी रक्त सांडलेले आहे आणि त्यागही केलेला आहे. पण बोटींना, विमानतळांना, बंदरांना, विद्यापीठांना अशी जमेल तेथे जवळपास ४४२ ठिकाणी गांधी-नेहरु घराण्याची नावे आहेत. देशासाठी रक्तच सांडण्याचा विषय असेल तर सध्या आपल्या सीमेवर नित्य अनेक जवान शहीद होत आहेत. त्यातले कित्येक जवान तर कमालीची मर्दुमकी गाजवून देशासाठी प्राणत्याग करत आहेत. त्यातल्या एखाद्याचे तरी नाव कॉंग्रेसच्या सरकारने आपल्या योजनांना द्यायला हवे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही आणि नावे दिली तर त्यासाठी रक्तच सांडलेले असावे असे काही म्हणता येत नाही.

एखाद्या क्षेत्रात एखादी व्यक्ती खूप स्पृहणीय काम करते. एखादी व्यक्ती जन्मभर एकाच कामाला वाहून घेते. त्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते असतात. काही कलाकार असतात. काही लेखक असतात. तेव्हा त्या त्या क्षेत्रातील योजनांना किंवा स्थळांना नावे देताना त्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीचे नाव दिले पाहिजे. किंबहुना सरकारने योजनांना नावे देण्याच्या बाबतीत एखादी आचारसंहिता जारी केली पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातील योजनांना देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांची नावे द्यावीत. उद्योगविषयक योजनांना उद्योगपतींची नावे द्यावीत. अशा प्रकारची एखादी सुचनावली सरकारने तयार केली पाहिजे. तर नावाचा असा अट्टाहास टळेल.

Leave a Comment