नवी दिल्ली – सरकारने करबुडवेगिरी करून अतिश्रीमंत झालेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी व्यापक योजना तयार केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यात पुढाकार घेतला असून तशा सूचना अर्थमंत्र्यांना दिल्या आहेत. अशा व्यक्तींची सूची तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांना जाळय़ात पडकले जाणार आहे.
करबुडव्या कुबेरांवर होणार कठोर कारवाई
५० कोटी रूपये किंवा त्याहून अधिक ज्यांचे उत्पन्न आहे, अशांपैकी केवळ ६ व्यक्तींनी २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात प्राप्तीकर विवरणपत्र भरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांची संपत्ती ५ कोटी डॉलर्सहून (सुमारे ३३० कोटी रूपये) अधिक आहे अशा भारतात २१००हून अधिक व्यक्ती आहेत, अशी माहिती क्रेडिट स्यूसीच्या जागतिक संपत्ती अहवालात म्हटले आहे. तर फोर्ब्स ने प्रसिद्ध केलेल्या सूचीत भारतात ८४ अब्जाधीश असल्याचे म्हटले आहे.
हे श्रीमंत एकतर कर भरतच नाहीत. किंवा फारच कमी कर भरतात. त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांनी भरलेल्या कराचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याखेरीज गत्यंतर नाही, अशा निष्कर्षापर्यंत सरकार पोहचले आहे. भारतात २७ कोटी लोकांचे प्रत्येकी उत्पन्न दिवसाला १३० रूपयांहूनही कमी आहे. एवढय़ा तुटपुंज्या उत्पन्नात त्यांना आयुष्य कंठावे लागते. तर दुसरीकडे अब्जावधी डॉलर्सची करचुकवेगिरी होत आहे. ही विसंगती टाळल्याखेरीज अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही. तसेच गरीबांसाठी सरकार ज्या योजना राबवित आहे, त्यांना निधी देण्यासाठीही कराचे उत्पन्न वाढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात या करचुकवेगिरी करणाऱयांना करविभाग चांगलाच धडा शिकविणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.