एअर इंडियात ‘जय हिंद’ने होणार प्रवाशांचे स्वागत

air-india
नवी दिल्ली: एअर इंडिया विमान सेवेच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपनीची होणारी नाचक्की रोखण्यासाठी आता एअर इंडियाने पावले उचलली असून या विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांचे स्वागत यापुढे ‘जय हिंद’ म्हणून केले जाणार आहे. राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या विमान कंपनीचा ‘जय हिंद’ या शब्दाने प्रवाशांचे स्वागत करीत उद्देश असल्याची चर्चा आहे.

अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या पत्रात एअर इंडियाचे या शासकीय विमान कंपनीचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी ‘जय हिंद’ हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. कमांडर्सनी प्रवाशांशी पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले.

नुकसानीत असलेल्या एअर इंडियाचा नफा कमावण्याच्या दिशेने लोहानी यांनी वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी पत्रात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या कंपनी विरोधात तक्रारीही वाढल्या होत्या. कर्मचाऱ्यांमधील भांडणांतून होणाऱ्या विलंबामुळे या विमान कंपनीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. यामुळे आता असे हे नवे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment