किड्यासारखा उडणारा व बसणारा रोबो बी

robo-bee
वैज्ञानिकांनी किड्याच्या आकाराचा व किड्याप्रमाणे भिंतीवर बसू शकणारा व उडू शकणारा रोबो तयार केला असून त्याचे नामकरण रोबो बी असे केले गेले आहे. हा रोबो छतावरही बसू शकतो व उडू शकतो. हा रोबो बनविण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक अॅडाईशन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. फुगे थोडेस घर्षण केल्यावर जसे भिंतीला चिकटतात त्याच तत्त्वावर हा रोबो बनविला गेला आहे. हे एक प्रकारचे रोबो ड्रोनच आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून त्यांचा आकार १० पेन्सच्या नाण्याएवढा आहे. किड्यांच्या टोळीप्रमाणेच ही रोबो टोळी वापरता येते.

लंडन इंपिरियल कॉलेजच्या एरियल रोबोटिक्स प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. मियार्को कोवास या संदर्भात माहिती देताना म्हणाले ही रोबो टीम वातावरणावर देखरेख ठेवणे तसेच संकट काळात मदतगार ठरेल. सेंसरसह असलेले हे रोबो स्वस्त व छोट्या आकाराचे आहेत. दाट जंगलात लागलेली आग, नैसर्गिक संकटे अशा ठिकाणची अचूक परिस्थिती हे रोबो देऊ शकतील त्यामुळे मदत कार्यात तसेच संकट निवारणात मदत होऊ शकेल.

उडणारे व फिरणारे रोबो अधिक उर्जा खर्च करतात मात्र उंच स्थानी बसू शकणार्‍या रोबोंना ही समस्या येत नाही. पक्ष्यांच्या पंजाप्रमाणे रोबोंसाठी पंजे बनविणे अवघड असते व त्यामुळे या रोबोंमध्ये इलेक्टॉनिक चार्जसह छोटी लँडींग पॅड डिझाईन केली गेली आहेत. ही पॅड स्विच ऑन व ऑफ करता येतात. स्विच ऑन करताच पॅडवर निगेटिव्ह चार्ज तयार होतो व पॉझिटिव्ह सरफेसच्या पृष्ठभागावर चिकटू शकतात. या रोबोंमुळे मायक्रो सर्जरीतही क्रांतीचे नवे रस्ते खुलतील असे रोबो तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment