औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले एव्हरेस्ट शिखर

everest
औरंगाबाद : कोणत्याही संकटांचा सामना जिद्दीच्या जोरावर करून आपले ध्येय साध्य करता येते, हे औरंगाबादचे पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी सिद्ध करून दाखविले आहे. जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर त्याने सर केले असून, अशी सर्वोच्च कामगिरी करून दाखविणारा तो पहिलाच पोलिस कॉन्स्टेबल ठरल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस कॉन्स्टेबल रफीक शेख याचे हे ब-याच दिवसांचे स्वप्न होते.

जगातील सर्वांत उंच शिखर असलेले एव्हरेस्ट शिखर एक ना एक दिवस आपण सर करू, अशी खुनगाठ मनाशी बाळगली होती. त्याने कधी काळी उराशी बाळगलेले हे स्वप्न अखेर साकार झाले. खरोखरच त्याच्या या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. रफीक हा औरंगाबाद जिल्ह्यातील नायगावचा रहिवासी. त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला. परंतु त्याने लहानपणापासूनच एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला होता. सध्या तो औरंगाबाद येथील पोलिस मुख्यालयात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.

एक तर घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच्यासमोर बरीच आव्हाने होती. परंतु काहीही केले, तरी आपण मागे हटायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बाळगली. मागील दोनवेळा म्हणजेच २०१४ आणि २०१५ मध्ये त्याला दानशूर व्यक्तींनी मदत केली होती. त्यामुळे त्याने आपला निश्चय पक्का करून अखेर त्या दिशेने वाटचाल केली. परंतु मागच्या दोन्ही वेळी वातावरण अनुकूल नसल्याने परत यावे लागले होते. परंतु त्यातूनही तो खचला नाही.

अखेर यावर्षी पुन्हा त्या दिशेने झेप घेतली. प्रसंगी गावातील घर विकू पण एव्हरेस्ट शिखर सर करू, असे म्हणत त्याने त्या पद्धतीने नियोजन केले आणि त्याच्या जिद्दीसमोर सर्वच आव्हाने थिटे पडले आणि १९ मे रोजी त्याने अखेर एव्हरेस्ट शिखर सर करून आपले स्वप्न साकार केले. अर्थात, त्याने तब्बल तीन वर्षे सतत अथक प्रयत्न केले आणि आज सकाळीच एव्हरेस्टला गवसणी घातली. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तो एव्हरेस्ट सर करणारा पहिलाच पोलिस कॉन्स्टेबल ठरला आहे.

Leave a Comment