आता युको बँक, बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरणासाठी प्रयत्न

bank
नवी दिल्ली : पाच सहयोगी बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यासाठी विचार करण्याला प्रोत्साहन दिल्यानंतर सरकार आता आपल्या तीन बँका, युको बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न करत आहे. या तीन बँकांची सध्या आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे चांगली आर्थिक स्थिती असणा-या बँकेमध्ये या बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी चर्चा झाली असून याबाबत सध्या अनेक पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.

याबाबत अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, यावर सध्या प्राथमिक चर्चा करण्यात येत आहे. बँकेकडून विलीनीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव येण्याची जास्त आवश्यकता आहे. केंद्र सरकार यामध्ये फक्त मदत करणार आहे. विलीनीकरण करण्यामुळे डबघाईला आलेल्या बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

पाच सहयोगी बँकांचे आणि भारतीय महिला बँकेला विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव एसबीआयने सादर केला आहे. ही प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याचे एसबीआयने शेअरबाजारला माहिती देताना म्हटले आहे. एसबीआय विलीनीकरण करताना सहयोगी बँकांकडून आणि भारतीय महिला बँकेकडून ५ हजार कोटी रुपयांची रक्कम घेणार आहे.

Leave a Comment