तुम्ही पाहिला आहे का नागराजचा ‘पिस्तुल्या’ ?

pitulya
आतापर्यंतचे मराठीसिने सृष्टीतील सारे विक्रम दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराटने मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांत ५५ कोटींची कमाई केली असताना नागराजचा सैराट पुढील काही दिवसांत ७५ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे हा पहिला दिग्दर्शक आहे ज्याच्या तिन्ही कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्काराची शाबासी मिळाली आहे. नागराज मंजुळेच्या पहिल्या पिस्तुल्या या लघुपटाला देखील दिग्दर्शक आणि बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

अहमदनगरच्या एका महाविद्यालयात जनसंज्ञापनाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नागराज मंजुळे आणि त्यांच्या सहका-यांनी बनवलेल्या या लघुपटाने दमदार आशयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतली. मंजुळे स्वत: वडार समाजातून आल्याने त्यांनी या समाजाच केलेले चित्रण वास्तवाला स्पर्श करणार आहे.

वडार, पारधी यासारख्या मागासवर्गीय समाजाच्या जीवनशैलीसंबंधीत ‘पिस्तुल्या’ या नावावरूनच हा लघुपट असावा याची कल्पना येते. तसा तो आहे ही.एका पारधी मुलाची शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष या १५ मिनिटांच्या लघुपटात चितारण्यात आला आहे. पिस्तुल्या या मुख्यपात्राबरोबर या लघुपटात अगदी मोजकी पात्र असली तरी पारधी समाजाची व्यथा त्यातून नेमक्या पद्धतीने चितारण्यात आली आहे. मंजुळे आणि त्यांच्या वर्गमित्रांनी लघुपटासाठी स्क्रिप्टरायटिंग, छायाचित्रण, एडिटिंग सर्व काही केले आहे.