राहुल गांधींची सत्त्वपरीक्षा

rahul-gandhi
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषतः पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता खरोखर किती आहे याची परीक्षा होणार होती. मात्र त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणाने या पाचही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे काय होणार हा प्रश्‍न सर्वांना पडला होता. कारण पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे नव्या दमाने कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यास पुढे सरसावले होते. आसाम आणि केरळमधली सत्ता राखणे आणि पश्‍चिम बंगाल तसेच तामिळनाडूमधील सत्ता तिथल्या प्रादेशिक पक्षांकडून खेचून घेणे अशी दोन आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती. मात्र ही आव्हाने झेलण्याइतकी ताकद किंवा धमक त्यांच्यात नाही. हे आता पुरतेपणी सिध्द झाले आहे. कॉंग्रेसने आसाममधील सत्ता केेवळ गमावलीच आहे असे नव्हे तर तिथे भाजपाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत आसाममध्ये कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होतीच परंतु स्वातंत्र्यापासून ईशान्य भारतातली लहान लहान राज्ये कधीच भाजपाला जिंकता आली नव्हती. त्या राज्यांकडे जाण्याचा मार्ग भाजपासाठी आसाममधून सोपा झाला आहे.

कॉंग्रेसने केवळ आसामच गमावला आहे असे नाही तर ईशान्य भारतातल्या आपल्या प्रभावाला ओहोटी लागेल याची खात्री केली आहे. अर्थात एवढा दूरगामी दृष्टीकोन ठेवण्याची क्षमता असणारा नेता कॉंग्रेसमध्ये कोणीच नाही त्यामुळे आसामच्या पराभवाचे दूरगामी परिणाम त्यांच्या लक्षात येत नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे या निवडणुकीत मोदींची लोकप्रियता अजून किती आहे हाही प्रश्‍न विचारला गेला. निकालावरून तरी असे दिसते की मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. भाजपाला तामिळनाडू, केरळ आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये फार मोठे यश मिळाले नाही. भारताच्या राजकारणातले अंतःप्रवाह ज्यांना कळतात त्यांना हे लक्षात येते की या राज्यांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले नसले तरी केरळमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातला पहिला हिंदुत्ववादी आमदार निवडून आला आहे. म्हणजे प्रामुख्याने उत्तर भारतातला पक्ष समजल्या जाणार्‍या भारतीय जनता पार्टीचा केरळाच्या विधानसभेत चंचूप्रवेश झाला आहे. ही गोष्ट मोठी ऐतिहासिक ठरणार आहे. मात्र त्यापेक्षाही पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला ७ जागा मिळाल्या ही गोष्टही अधिक महत्त्वाची आहे. कारण केरळातला चंचूप्रवेश एका आमदारानिशी झाला पण पश्‍चिम बंगालमधला प्रवेश ७ आमदारानिशी झाला आहे. एकंदरीत भाजपाने आसाम तर जिंकलाच पण केरळ आणि पश्‍चिम बंगाल ही आपली नवी प्रभावक्षेत्रे असतील हे दाखवून दिले आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसचा निर्णायक पराभव आपण करू शकणार नाही हे कॉंग्रेसला माहीत होते म्हणून त्यांनी तिथे डाव्या आघाडीशी युती करून निवडणूक लढवली. खरे म्हणजे डावी आघाडी आणि कॉंग्रेस ही राजकारणातली दोन मोठी शक्तीस्थळे आहेत. परंतु या दोघांनाही स्वतःच्या ताकदीची खात्री वाटत नव्हती. त्यांच्या मनातला न्यूनगंड त्यांनी युती करून व्यक्त केला आणि तो न्यूनगंड खरा होता हे जनतेने त्यांना दाखवून दिले. दोघांना एकत्र येऊनसुध्दा ममता बॅनर्जी यांचा पराभव करता आला नाही. ममता बॅनर्जी तर विजयी झाल्याच परंतु त्यांनी आपले पक्षबळ १७० वरून २१० पर्यंत पुढे नेले. एकेकाळी पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आणि डावी आघाडी या दोघांनाही हातात हात घालून निवडणूक लढवूनही ५० पेक्षा अधिक जागा मिळवता आल्या नाहीत. कॉंग्रेसने ज्या डाव्या आघाडीशी पश्‍चिम बंगालमध्ये युती केली त्याच डाव्या आघाडीच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष केरळमध्ये शड्डू ठोकून उभा राहिला.

डावी आघाडी आणि कॉंग्रेस यांचे नाते मोठे विचित्र राहिले. बंगालमध्ये दोस्ती आणि केरळात कुस्ती अशी दुहेरी नीती या दोन्ही पक्षांनी राबवली. मात्र बंगालमधल्या आखाड्यात पाठ लागलेल्या या दोन्ही मल्लांना केरळमध्ये वेगळ्या निकाला सामोरे जावे लागले. बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसने दोघांचीही पाठ लावली. पण केरळमध्ये डाव्या आघाडीने कॉंग्रेसला लोळवले. कॉंग्रेसचा भ्रष्टाचार आणि बजबजपुरी यांचे बक्षिस कॉंग्रेसला मिळाले. तिथे डावी आघाडी स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आली. तामिळनाडूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून काही वेगळे एक्झिट पोल समोर आले होते आणि त्यामध्ये जयललिता पराभूत होतील असे संकेत दिले जात होते. परंतु जयललितांनी हे अंदाज खोटे ठरवत द्रमुकला पराभूत केले. सलग दोन वेळा सत्ता मिळवण्याचा नवा विक्रम त्यांनी नोंदवला. त्यापूर्वी त्यांचे गुरु असलेल्या एम. जी. रामचंद्रन यांनीच असा विक्रम ७८ साली केला होता. त्यानंतर या राज्यातल्या कोणत्याही सरकारला ते शक्य झाले नाही. ते जयललितांनी शक्य केले. तामिळनाडूचाच राजकीय प्रभाव असलेल्या पुडुचेरीत मात्र कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे आणि तिथे सत्ता प्राप्त झाली आहे. आता सध्या कॉंग्रेसचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र अतीशय लहान राज्यांमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आहे. म्हणावे असे कोणतेही मोठे राज्य कॉंग्रेसच्या हातात नाही. ही कॉंग्रेसच्या र्‍हासाची सुरूवात आहे.

Leave a Comment