जुलैपासून मुंबई विद्यापीठात विकेन्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम

mumbai
मुंबई – जुलैच्या पहिल्या वीकेन्डपासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे होणा-या वीकेन्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांस सुरुवात होत आहे. बहि:शाल म्हणजे भिंतीबाहेरील शिक्षणाचे हे अभ्यासक्रम शिकण्यातील आनंद जपत, औपचारिक नियमांना फाटा देत शिकवले जातात. शिक्षणाच्या किंवा वयाच्या अटी यात नाहीत. ज्यांना आपली साप्ताहिक सुट्टी कारणी लावून आवडीचा विषय शिकावा, व्यक्तिमत्त्व संपन्न करावे, असे वाटते त्या कुणालाही यात प्रवेश मिळू शकतो. शिकवण्याचे माध्यम, नाटक आणि उद्यानकला हे दोन मराठीत चालणारे अभ्यासक्रम वगळता, इंग्रजी असेल.

या सर्व अभ्यासक्रमांत त्या त्या विषयाच्या गरजेनुरूप काही स्थळांना भेटी, अभ्यास सहली आणि प्रत्यक्षानुभव यांचा समावेश असतो. २ आणि ३ जुलैपासून सुरू होणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत. माध्यम-इंग्रजी-फक्त रविवार-जुलै ते मार्च ऍस्ट्रॉनमी अ‍ॅण्ड ऍस्ट्रोफिझिक्स (खगोल आणि खगोलभौतिकी) (पुरातत्त्व) एन्शन्ट इंडियन आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस (प्राचीन भारतीय कला आणि विज्ञाने), टॅक्सॉनमी ऑफ अ‍ॅनिमल्स अ‍ॅण्ड प्लान्ट्स (प्राणी आणि वनस्पती यांचे वर्गीकरणशास्त्र), जिऑलजी (भूशास्त्र) माध्यम-मराठी नाटय़कला (जुलै ते डिसेंबर-शनिवार-रविवार), रोपवाटिका व्यवस्थापन आणि उद्यानकला (जुलै ते डिसेंबर-शनिवार-रविवार) या अभ्यासक्रमांच्या अखेरीस परीक्षा दिल्यास प्रमाणपत्र आणि परीक्षा न देता नियमित उपस्थित असल्यास उपस्थिती प्रमाणपत्र मिळते. प्रवेशासाठी कोणतीही कागदपत्रे सोबत आणण्याची गरज नाही. केवळ एक फोटो सोबत आणावा. सर्व अभ्यासक्रमांची विषयसूची www.extramural.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शुल्क भरण्यासंबंधीच्या सूचनाही उपलब्ध आहेत. विभागाचे दूरध्वनी क्रमांक २६५३०२६६ आणि ९८२१८०४७८६ यावरही संपर्क करता येईल, अशी माहिती विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक यांनी दिली.

Leave a Comment