ऊन-पावसाचा खेळ

rain
लवकर येणार म्हणून आशा दाखवून आता सावकाश येऊ पाहणारा पाऊस आणि संपला संपला म्हणतानाही पुन्हा एकदा वाढलेला उन्हाचा तडाखा यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पाऊस लवकर येईल असे म्हटले गेले होते परंतु आता त्याचे आगमन ४-५ दिवस लांबणीवर पडले आहे. दर वर्षी १५ मेला उच्च तापमान खाली घसरायला लागते तसे ते आता घसरायला लागेल अशी आशा लागलेल्या असतानाच येत्या १५ दिवसात म्हणजे १७ मे पासून ३१ मे पर्यंत उन्हाची तीव्र लाट येईल असा इशारा मिळाला आहे. म्हणजे ऊन संपत नाही आणि पाऊस काही लवकर येत नाही असा ऊन-पावसाचा खेळ आपल्या मनात सुरू झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून आपण निसर्गाचे विचित्र खेळ अनुभवत आहोत. भर उन्हाळ्यातली गारपीट आपण पाहिली आहे. पावसाळ्यातले चांदणेही पाहिले आहे. आता आपण उन्हाळ्याच्या तीव्रतेचा ज्वलंत अनुभव घेत आहोत. असा हा अनिश्‍चिततेचा खेळ सुरू असतानाच केरळात पावसाला सुरूवात झाल्यामुळे महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात वळवाच्या सरी कोसळायला लागतील अशी आशा वाटत आहे. केरळच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत आणि तिथे सध्या जोरदार पाऊस सुरू असून येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस येईल असा अंदाजही व्यक्त झाला आहे. हा पाऊस मोसमी वार्‍याचा नसला तरी आपल्या मनाला दिलासा देणारा आहे. कारण कोणताही पाऊस पडला तरी आपला उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

उन्हाने आपल्याला फारच त्रस्त करून टाकले आहे. विशेषतः दरवर्षी एप्रिलच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत जशी उष्णतेची लाट येत असते. तशी ती एप्रिलच्या पूवार्धातच येऊन गेली आहे. गेल्या आठवड्यात आपण उन्हाची तीव्रता कमी होण्याची प्रतिक्षा करत होतो. पण गेल्या दोनतीन दिवसात महाराष्ट्राच्या बर्‍याच मोठ्या भागात पुन्हा एकदा तीव्र तापदायक उन्हाने लोकांच्या जिवाची लाहीलाही झाली. नांदेड अकोल्यापासून नागपूर आणि रायपूरपर्यंतचा पट्टा तसा तीव्र उन्हाचा मानला जातो आणि अपवादात्मक प्रसंगात या पट्ट्यात कधी कधी ४६ डिग्रीपर्यंत तापमान नोंदलेही जाते. एखादेवेळी अशी टोकाची नोंद झाली की त्या हंगामात सर्वसामान्यपणे ४० ते ४३ डिग्री दरम्यान सातत्याने तापमान नोंदले जाते. परंतु यावेळी एक विचित्र अनुभव येत आहे. अपवादात्मक विक्रमी तापमानाच्या आसपास म्हणजे ४४ ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद दररोजच व्हायला लागली आहे.

Leave a Comment