शेअर मार्केटमध्ये यंदा ईपीएफओ ६००० कोटी रुपये गुंतवणार!

bandaru-dattatry
हैदराबाद : ईपीएफओ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना चालू आर्थिक वर्षात शेअर मार्केटमध्ये सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम गुंतवणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ईपीएफओचे केंद्रीय विश्वस्त मंडळच करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कामगार मंत्री या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

ईपीएफओने गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०१५-१६ मध्येही एसबीआय म्युच्युअल फंडाच्या दोन ईटीएफच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये सहा कोटी रुपयांची रक्कम गुंतवली होती. यावर्षीही ईपीएफओ शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. कारण शेअर मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अल्पकाळात त्यापासून फारसा फायदा होत नसल्यामुळेच दीर्घकाळ पीएफची रक्कम गुंतवलेली राहण्यासाठी नियमित गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

ईपीएफओच्या शेअर बाजारातील प्रस्तावित गुंतवणुकीबाबत बँकर्स, गुंतवणूक व्यवस्थापक, बीएसई आणि एनएसईचे अधिकारी यांच्याशी सल्लामसलत सुरु असल्याची माहितीही बंडारू दत्तात्रेय यांनी दिली. गेल्या वर्षीपासून अर्थमंत्रालयाने ईपीएफओला त्यांच्या एकूण निधीपैकी कमीत कमी पाच टक्के ते जास्तीत जास्त १५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्याची परवानगी दिली आहे.

मात्र ईपीएफच्या व्यावस्थापन समितीने म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने फक्त पाच टक्के रक्कमच शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षात गुंतवलेली रक्कम आणि या वर्षातील प्रस्तावित गुंतवणूक याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने एक अहवाल बनवला आहे. त्यावरही विचार होणार असल्याचे दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले. केंद्रीय श्रम मंत्रालयाने बनवलेल्या अहवालाच्या आधारे किती रक्कम ईटीएफमध्ये आणि किती रक्कम सरकारी उद्योगांच्या शेअर्समध्ये गुंतवायची याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Comment