राज्यात लवकरच शंभर जनऔषधी केंद्रे

cm
मुंबई : केंद्र सरकारबरोबर राज्यात शंभर जनऔषधी केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून नागपूर येथे मेडिकल डिव्हाईस पार्क आणि औरंगाबाद येथे बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च नागपूर येथे केंद्र उभारण्याबरोबरच केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी येथे दिली.

येत्या सहा महिन्यांत या सर्व कामांना सुरुवात होईल, असेही अनंत कुमार यांनी या वेळी सांगितले. केंद्रीय रसायन व खतेमंत्री अनंत कुमार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याबरोबर राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री अनंत कुमार बोलत होते. या बैठकीस विविध विभागांचे सचिव, उपसचिव, अधिकारी आणि कर्मचा-यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात या वर्षात तीन हजार जनऔषधी केंद्रं सुरू करण्याचे घोषित केले आहे.

त्यातील शंभर जनऔषधी केंद्रं महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच राज्य व केंद्र शासन यांच्यात करार करण्यात येणार असल्याचे अनंत कुमार यांनी सांगितले. या जनऔषधी केंद्रांमध्ये सुमारे विविध ६०० जेनेरिक औषधे व १५० इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याची किंमत ही बाजारभावापेक्षा कमी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, महानगरपालिकांची रुग्णालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ही जनऔषधी केंद्रे उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध होतील. या केंद्रासाठी राज्य शासन जागा उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शंभर टक्के जैनेरिक औषधांचा पुरवठा करावा, अशा सूचनाही फडणवीस यांनी या वेळी दिल्या.

पुणे व जळगावमध्ये सीआयपीईटीची केंद्रे प्लास्टिक अभियांत्रिकी क्षेत्रात सध्या साडेआठ लाख कुशल अभियंत्यांची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी केंद्र शासन देशभरात चाळीस ठिकाणी केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) उभारत आहे. महाराष्ट्रातही औरंगाबाद व चंद्रपूर येथे हे केंद्र सुरू असून जळगाव व पुणे येथे नवीन संस्था उभारण्यात येणार आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment