मंगळावरील वातावरण हिवाळ्यात अत्यंत स्वच्छ

mars
वॉशिंग्टन : मंगळ या ग्रहावरील वातावरण हिवाळ्यात अत्यंत स्वच्छ असते तर उन्हाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये तेथील वातावरण धुळीने भरलेले असते. याशिवाय प्रचंड वेगाने वारेही वाहत असतात. या महत्त्वपूर्ण संशोधनाची माहिती ‘नासा’ च्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये एका भारतीय संशोधकाचाही समावेश आहे.

चार वर्षांपूर्वी मंगळावर असलेल्या गेल क्रेटरमध्ये उतरलेल्या ‘नासा’ चे रोबोटिक यंत्र क्युरिओसिटी मार्स रोव्हरने वातावरणाच्या दोन सत्रांचा अभ्यास करून ही माहिती दिली आहे. याशिवाय किरकोळ बदलही मंगळाच्या वातावरणावर परिणाम करतात. मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पानगळीच्या हंगामात मिथेन या वायूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, दुस‍-या हंगामात याची पुनरावृत्ती होत नाही.

क्युरिओसिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेले भारतीय संशोधक अश्विन वसावडा यांनी सांगितले की, रोबोटिक यंत्राने मंगळावरील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तासाच्या वातावरणाचा सविस्तर अभ्यास केला आहे. यामध्ये गेल क्रेटरनजीक असणारे तापमान, हवेचा दाब, हवेतील बाष्प या घटनांचा समावेश आहे. उन्हाळ्यात मंगळावरील तापमान १५.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. तर हिवाळ्यातील रात्रीचे तापमान उणे शंभर अंश सेल्सिअसपर्यंत असते. तेथील हवेतील बाष्प पृथ्वीवरच्या बाष्पापेक्षा दहा हजार पटींनी कमी असते. हा ग्रह पृथ्वीवरच्या ६८७ दिवसांत सूर्याचा एक फेरा पूर्ण करतो.

Leave a Comment