बियरसाठी घातली जातेय पाईपलाईन

bier
बेल्जियममधील ब्रग्स शहरातील गल्ली बोळातून बियर वाहून नेण्यासाठी चक्क पाईपलाईन टाकली जात असल्याचे वृत्त आहे. ज्या भागातून ही लाईन जाणार आहे तेथील रहिवाशांनी आनंदाने अशी पाईपलाईन टाकायला परवानगी दिली आहे पण त्यांच्या दाराजवळ या पाईपलाईनची एक तोटी बसविली जावी अशी छोटीशी अट घातली असल्याचेही समजते. या पाईपलाईनचे काम या वर्षअखेर पूर्ण केले जाणार असून तिची लांबी आहे २ मैल. या लायनीतून तासाला ४ हजार लिटर बियर वाहून नेली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेली १६० वर्षे झेविअर वेनेस्टा परिवाराची या शहरात बिअरची भट्टी आहे. त्यांनी त्यांचा बॉटलिंग प्र्लांट शहराबाहेर हलविला आहे. मात्र शहराच्या गल्ली बोळातून बॉटलिंग प्लांटकडे बिअर नेणारे टँकर रस्ते अरूंद असल्याने हे काम वेगाने करू शकत नाहीत. त्यावर हा उपाय काढला गेला आहे. या पाईपलाईनसाठी ४५ लाख डॉलर्स खर्च येणार आहे. कंपनीने त्यासाठी क्राऊनफंडिंग केले असून सर्वात मोठा दानशूर फिलीप मि लॉप याने त्यात ११ हजार डॉलर्स गुंतविले आहेत. त्याबदली फिलीपला आजन्म मोफत बिअर पुरविली जात आहे.

Leave a Comment