नॅनो व्हॉयेजर्सचा वापर कर्करोगावरील उपचारात शक्य

cancer
बंगळुरू : येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी कर्करोगावरील उपचारांत दूरगामी बदल घडवून आणणारी उपचार पद्धत विकसित केली असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकाराचे कर्करोग इतर वाईट परिणाम न होता बरे करता येणार आहेत. यात औषधांचे रेणू पेशींपर्यतच वाहून नेण्यासाठी सूक्ष्म अशा वाहकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे केमोथेरपी टाळता येणार आहे. केमोथेरपीचे अनेक दुष्परिणाम असून ती पद्धत सध्या कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी वापरली जाते. शरीराला कुठेही छेद न देता वापरता येणारी ही पद्धत आहे.

पाच नॅनोमीटर लांबीचे सूक्ष्म नॅनोव्हायेजर्स शरीरात पाठविण्यात संस्थेच्या वैज्ञानिकांनी यश मिळविले असून ते आधीच शोधलेल्या पेशीपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जांश भाग असतो. नॅनो व्हायेजर्स कर्करोगविरोधी औषधे घेऊन थेट संबंधित पेशीपर्यंत जातात व त्यांचा नाश करतात. आता या संशोधनाचा प्रत्यक्ष वापर बंगळुरू येथील किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑनकॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून सुरू केला जाणार आहे. प्रारणतज्ज्ञांना औषधांचे रेणू शोधण्याची ही पद्धत अचूकपणे वापरण्यास शिकविले जाणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगात नवीन पद्धत वापरण्यात आली असून त्याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. त्यातही जिवंत उंदरात अजून प्रयोग केलेले नाहीत. जिवंत उंदरावर प्रयोग केल्यानंतरच त्याचे माणसांवर प्रयोग केले जाणार आहेत. प्रा. अंबरीश घोष यांनी सांगितले की, नॅनो व्हायेजर्सचा वापर थेट पेशींना लक्ष्य करताना शक्य आहे. अचूकपणे कर्करोगग्रस्त पेशींवर यात मारा केला जाईल. कर्करोगविरोधी औषधे यात थेट पेशीमध्ये सोडली जातील.

नॅनो व्हॉयेजर्स शरीरात सोडल्यानंतर चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने शरीरात फिरविले जातील. नॅनो व्हॉयेजर्स हे सिलिकॉन ऑक्साईडचे तयार केले असून ते सिलिकॉनचे ऑक्साईडस आहेत. पाण्यात प्रयोग करण्यात आले असून नंतर ते प्रयोगशाळा पातळीवर रक्तातही केले गेले. त्यात रक्तातील लोहाचा व्हॉयेजर्सवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यावर उपाय म्हणून आयआयएससीचे प्रा. श्रीनिवासराव शिवशंकर यांनी झिक फेराईट्स तयार केले असून ते रक्तात नॅनो व्हॉयेजर्सच्या रूपात सोडले तरी खराब होत नाहीत. ते जैवविघटनशील असल्याने सिलिकॉनच्या व्हॉयेजरवर या फेराईटसचे आवरण देता येईल. स्किझोफ्रेनिया व अल्झायमरवरही या तंत्राचा वापर करणे शक्य आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment