पोरकटपणाला धडा

trio
राजकारण म्हटल्यानंतर सारा गोंधळच असतो. कोणीही कोणावर काहीही टीका करतो. त्या प्रत्येक टीकेला कोणी उत्तरही देत नाही आणि कोणी आव्हानही देत बसत नाही. त्यामुळे काही लोकांचा असा समज होतो की निवडणूक प्रचाराच्या गदारोळात कोणावरही कसलाही आरोप केला तरी चालतो तसा आरोप करताना आपल्या हातात काही पुरावे असले पाहिजेत याची काही गरज नाही असे हे लोक समजतात. प्रचाराच्या धुराळ्यात काही वेळा असा सवंगपणा खपून जातो. किंवा त्या भरात छोटामोठा गुन्हा केला तरी तो कोणी दखलपात्र समजत नाही. परंतु असा आरोप करताना किंवा वाईट प्रचार करताना आपण कोणावर आरोप करत आहोत याचे भान ठेवले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता असते.

अशा पोरकटपणामध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेले नेते म्हणजे अरविंद केजरीवाल त्यांनी देशातल्या भ्रष्ट लोकांची यादी घोषित करायला सुरूवात केली आणि २० लोकांची नावे भ्रष्ट म्हणून जाहीर केली. काही नेते खरोखर भ्रष्ट असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अशा पोरकट आरोपांना आव्हान देण्याचे नैतिक सामर्थ्य नसते. त्यामुळे आरोपाकडे दुर्लक्ष करतात आणि उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि म्हणूनच केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या २० नावांपैकी १८ जणांनी मौन पाळले. परंतु कपिल सिब्बल आणि नितीन गडकरी या दोघांकडे ते नैतिक सामर्थ्य आहे. त्यामुळे त्यांनी केजरीवाल यांच्या आरोपावर न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

राहुल गांधींनी असाच प्रकार केला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधींच्या हत्येचा थेट आरोप केला. त्यांना वाटले असा आरोप केल्याने काहीच होत नाही. परंतु संघाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या या विधानाला आव्हान दिले आणि त्यांना कोर्टात खेचले. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांचा आपण नरेंद्र मोदींना पर्यायी नेते आहोत असा दावा आहे. परंतु हे दोघेही एवढे पोरकट आहेत की त्यांना आपण काय बोलतो याचे भानही नसते. त्यामुळे हे दोघेजणही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पूर्ण अडकले आहेत आणि आपला पोरकटपणा अंगलट येणार हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू केली आहे. तिचाच एक भाग म्हणून त्यांनी बदनामीबद्दल शिक्षा करणारे कलमच कायद्यातून काढून टाकावे अशी विचित्र मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

Leave a Comment