भारतीय स्टार्टअपचा गुगल लाँचपॅड अॅक्सलेरेटर प्रोग्रॅममध्ये बोलबाला

google
नवी दिल्ली- ६ भारतीय स्टार्टअपची अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गुगल लाँचपॅड अॅक्सलेरेटर प्रोग्रॅममध्ये निवड करण्यात आली आहे.

१३ जूनपासून सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया येथे सुरू होणाऱ्या कार्यक्रमात भारतातील हे सहा स्टार्टअप सहभाग घेणार आहेत. टास्कजॉब, प्रोग्रॅमिंग हब, शेअरचॅट, रेडकारपेट, प्ले सिम्पल आणि मॅजिक पिन हे सहा स्टार्टअप निवडले गेले आहेत. ज्या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे, त्यांना सहा महिन्यांची मेंटरशिप मिळणार असून त्यांच्या स्टार्टअपसाठी ५०,००० डॉलर्सची गुंतवणूक देखील मिळाणार आहे. तसेच, गुगलच्या कॅलिफोर्नियातील कार्यालयात राहण्याची संधी मिळणार आहे.

करिअरच्या मध्यात गुगलकडून या प्रकारची मेंटरशिप आणि गुंतवणूक मिळणे हे प्रचंड फायद्याचे आहे. अनेक स्टार्टअपची सुरुवात चांगली होते पंरतु तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि बाजारातील रणनीती या स्तरांवर त्यांना संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत गुगल सारखा मोठा ब्रॅंड त्यांच्या पाठीशी असेल तर भविष्यात त्यांच्याकडून आणखी चांगले काम करण्याची आपण अपेक्षा करू शकतो, असे गुगलच्या पॉल रविंद्रनाथ यांनी म्हटले.

मुंबई स्थित टास्कबॉब विविध घरगुती सेवा पुरवते तर प्रोग्रॅमिंग हब हे स्टार्टअप विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरच्या विविध भाषा शिकविण्यास मदत करते. पायथॉन, एचटीएमल, सी या प्रकारच्या १५ संगणकीय भाषा हे स्टार्टअप शिकवते.

शेअरचॅट हे बंगळुरू स्थित स्टार्टअप आहे. शेअरचॅट हे व्हाट्सअॅपसारखे अॅप आहे. या अॅपद्वारे आपण मित्र मैत्रिणींशी संवाद साधू शकतो, व्हिडिओ, गाणे, फोटोज या द्वारे शेअर करता येतात.

प्ले सिम्पल या अॅपद्वारे आपण छोटे-मोठे गेम्स तयार करू शकतो आणि खेळू शकतो. फन सोशल गेम्स हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे.

दिल्ली स्थित रेड कार्पेट हे ऑनलाइन खरेदीसाठी लगेच अर्थसहाय्य पुरवते. नंतर इएमआय द्वारे तुम्ही ते कर्ज फेडू शकता.

मॅजिक पिन द्वारे आपण स्थानिक दुकानदारांसोबत जोडले जाऊ शकतो आणि त्यांच्याशी व्यवहार करू शकतो. गुगलच्या या कार्यक्रमात ब्राझील, इंडोनेशिया आणि मेक्सिकोमधील स्टार्टअप सहभाग घेणार आहेत.

Leave a Comment