अभियांत्रिकीला चाप

engineer
सरकारने अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रसारला चाप लावून त्यांचा दर्जा सुधारण्यावर भर द्यायला सुरूवात केली असून राज्यातल्या २५० पैकी ५४ महाविद्यालयांना त्यांचा कारभार गुंडाळण्याचा आदेश दिला आहे. देशात खुली अर्थव्यवस्था आल्यापासून अभियंत्यांना नोकर्‍याही मिळायला लागल्या होत्या आणि त्यामुळेच या महाविद्यालयांचे पीक फोफावले होते पण या पिकात दाणेदार माल कमी आणि फोलपटच जादा होते. म्हणून सरकारला ही कारवाई करावी लागत आहे. नाहीतर राज्यात जमेल तिथे ही कॉलेजे निघाली होती आणि त्यांनी जमेल तशा सोयी करून कमी दर्जाचे इंजिनियर तयार करायला सुरूवात केली होती. सरकारने या शिक्षण संस्थातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी जे काही करायला हवे होते ते केले नाही.

या कमतरतेमुळे मुले आणि मुली शिकायला लागल्या पण त्यांच्या शिक्षणाचा दर्जा काही सुधारला नाही. परिणामी मुले शिकतात पण त्यांना नोकर्‍या मिळत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली. दुर्दैवाची बाब अशी की, पूर्वी नोकर्‍याच निर्माण होत नसल्याने मुले बेकार होती पण आता अशी एक स्थिती आली की, नोकर्‍या आहेत, शिकलेली मुले आहेत पण तरीही त्यांचे शिक्षण दर्जेदार नसल्याने ही मुले शिकून सवरूनही बेकारच रहात आहेत. या स्थितीवर त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणे हाच एक उपाय आहे. दर्जेदार शिक्षण हे शब्द बोलायला सोपे आहेत पण ते अंमलात आणणे फार अवघड आहे कारण त्यासाठी चांगले शिक्षक नेमावे लागतात आणि साधनेही खरेदी करावी लागतात.

ते शक्य झाले नाही कारण शेवटी ही गुंतवणूक करायची झाली तर ती मुलांच्या शुल्कातूनच करावी लागणार होती. चांगल्या सोयी म्हणजे जादा फी. म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारला नाही तर त्यामुळे लोक ओरडणार आणि तो सुधारण्यासाठी फी वाढवली तरीही लोक ओरडणारच. अशी या महाविद्यालयांची दुहेरी गोची झाली. आजकाल प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. त्यामुळे मुलांच्या फियाही लाखांत गेल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षण दुरापास्त झाले आहे. शिक्षणाचा दर्जाही सुधारत नाही. या गोचीमुळे सुुमार दर्जा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना आता सरकारने धारेवर धरले आहे. ज्या महाविद्यालयांना आपला दर्जा सुधारता येत नाही आणि त्या निमित्ताने नेमल्या जाणार्‍या सोयींची पूर्तता करता येत नाही त्यांना आता महाविद्यालये बंद करण्याच्या नोटिसा देण्यास सुरूवात केली आहे. राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेवर हे एक मोठे संकट आहे आणि त्याचा सर्वांगीण विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment