नासाच्या केप्लर दुर्बिणीची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी

nasa
वॉशिंग्टन – आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा कामगिरीत नासाच्या केप्लर दुर्बिणीने सौरमालेबाहेर १२८४ नवीन बाह्य़ग्रह शोधून काढले असून आतापर्यंत केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या बाह्य़ग्रहांची संख्या त्यामुळे आधीच्या संख्येपेक्षा दुपटीहून अधिक झाली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या बाह्य़ग्रहांपैकी नऊ वसाहतयोग्य असण्याची शक्यता आहे, असे नासाने म्हटले आहे.

वॉशिंग्टनमधील नासाच्या मुख्यालयात मुख्य वैज्ञानिक एलेन स्टोफन यांनी सांगितले की, आपल्या सौरमालेबाहेर सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह फिरत असल्याची शक्यता या बाह्य़ग्रहांच्या शोधामुळे आणखी वाढली आहे. केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत शोधलेल्या व निश्चित केलेल्या ग्रहांच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.

जुलै २०१५ पर्यंत या दुर्बिणीने एकूण ४३०२ ग्रह शोधले, पण त्यांची निश्चिती झालेली नव्हती. आता शोधण्यात आलेले १२८४ ग्रह हे ९९ टक्के ग्रहच असण्याची शक्यता आहे. ग्रहासाठी आवश्यक असलेल्या अटी ते पूर्ण करतील अशी खात्री आहे. यापूर्वी १३२७ संभाव्य ग्रह शोधले गेले असून ते मात्र ग्रहाच्या व्याख्येत बसतात की नाही यासाठी अधिक अभ्यास करावा लागणार आहे. यातील उर्वरित ७०७ पदार्थ हे ग्रह म्हणावे की नाही या स्वरूपाचे आहेत. आधी वापरलेल्या तंत्राच्या आधारे इतर ९८४ पदार्थ मात्र ग्रह असण्याची शक्यता आहे. केप्लर दुर्बीण सोडण्यापूर्वी आपल्याला बाह्य़ग्रहांची काही माहिती नव्हती पण आता बाह्य़ग्रह सापडत आहेत व ताऱ्यांपेक्षा जास्त ग्रह सापडत आहेत, असे नासाच्या खगोलभौतिकी विभागाचे वैज्ञानिक पॉल हर्टझ यांनी सांगितले.

Leave a Comment