३१ ऑगस्टपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदत

income-tax
नवी दिल्ली – कर मंडळाने ३१ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत आयकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) सादर करणे आणि कर परताव्यासंदर्भातील प्रलंबित दावे दाखल करण्यासाठी जाहीर केली आहे.

२००९-१० ते २०१४-१५ या सहा आर्थिक वर्षांमधील विवरण पत्र, कर संबधीच्या अडचणी आणि परताव्याबाबतचे दावे सादर करण्याची शेवटची संधी कर मंडळाने करदात्यांना दिली आहे. करदात्यांना ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा आधार क्रमाकांद्वारे अथवा नेट बॅंकिंगच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. तसेच त्याची पोचपावती स्पीडपोस्टने ३१ ऑगस्टपर्यंत बंगळुरूला पाठवण्याचे आवाहन केले आहे. कर मंडळाला ३१ ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या प्रकरणांचा नोव्हेंबरपर्यंत निपटारा करून करदात्यांना परतावा दिला जाईल, असे कर मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

आयकर विवरणपत्र करदात्याने दाखल करणे आयकर कायद्यांतर्गत बंधनकारक असून प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर व्याजाचा भुर्दंड, परताव्यातील व्याजात घट, सुधारित विवरणपत्र भरणे, दुहेरी कर आकारणी आदी नुकसान होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय आयकर कायद्याच्या कलम २७१ एफ अंतर्गत आयकर अधिकारी मुदतीनंतर भरलेल्या विवरणपत्रांवर पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारू शकतो.

Leave a Comment