‘युपीएससी’त रिक्षा चालकाच्या मुलाने फडकाविला झेंडा!

ansar
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होण्याचा मान शेलगाव ता. बदनापुर येथील रिक्षा चालकाचा मुलगा असलेल्या शेख अन्सार शेख अहेमद याने अवघ्या २२ व्या वर्षीच मिळविला आहे. देशातून ३६१ व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची किमया त्याने केली आहे.

तो या परिक्षेची तयारी जुलै २०१३ पासून करत होता. अन्सारला कुंटूबाने अत्यंत हालाखीत जीवन जगत मोठे केले. त्याचे वडील जालन्यात रिक्षाचालक असून त्यांची तीन लग्ने झाली आहेत. त्याला तीन बहिणी असून त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अन्सारने स्वतः नोकरी करत आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्यात आला. युनिक अॅकॅडमीमध्ये त्याने स्पर्धा परीक्षेचा मेहनतीने अभ्यास केला आणि त्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

शेलगाव येथे जि. प. शाळेत मराठी माध्यमातून त्याचे १० वी पर्यतचे शिक्षण झाले. बदनापुर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान १० वी ला अन्सारने मिळविला होता. तद्‌नंतर १२ वी चे शिक्षण जालन्यातील बारवाले महाविद्‌यालयात घेतले. त्यावेळी महाविद्‌यालयातून दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला होता. त्यानंतरचे शिक्षण अन्सारने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्‌यालयात घेतले. मागील ४ वर्षापासुन तो पुणे येथे महाविद्‌यालयाच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेत होता. त्याच्या घरची परिस्थीती अत्यंत हलाखीची आहे. वडील शेख अहेमद हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह ५५ व्या वर्षीही चालवित आहे. त्यांची आई अजमद बी या दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करतात. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार असून अन्सार हा तिसऱ्याक्रमांकाचे अपत्य आहे.

मोठी बहीण शबाना हीने ७ व्या वर्गापर्यत शिक्षण घेतले असून ती विवाहीत आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची नाजमी ही सुध्दा ७ वी पर्यत शिकली असुन ती आपल्या पती समवेत जालन्याला राहते. तर सर्वात लहान अनीस याने ५ व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेले असून तो सध्या सिपोरा बाजार ता. भोकरदन येथे एका किराणा दुकानात कामावर आहे. अशा आर्थिक बिकट परिस्थितीत शेख अन्सार याने आपले शिक्षण घेत, आपली जिद्द पूर्ण केली. शेख अन्सारची मोठी बहीण शबानाला ही माहीती देताना गहिवरून आले होते.

शेख अन्सार सध्या दिल्लीला असल्याने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. मात्र अन्सारने स्वत: फोन करून ही गोड बातमी त्याच्या परिवाराला दिली. शेलगावात शेख यांच्या भाड्याच्या छोटयाशा घरात त्यांच्या आप्त स्वकियानी मोठी गर्दी करीत त्याचे अभिनंदन केले.

Leave a Comment