विना धनी पडून आहेत ईपीएफचे ४३ हजार कोटी

epfo
नवी दिल्ली : सरकारतर्फे संसदेत ईपीएफ म्हणजेच केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये ४३ हजार कोटी रुपये विना धनी पडून असल्याची माहिती देण्यात आली. ईपीएफची जी खाती पडून आहेत त्या खात्यांवरील निधीवर व्याज लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली.

विना वापराची खाती आणि ज्या खात्यांना वालीच नाही, अशी खाती या विषयी सध्या मोठा गोंधळ असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रकार थांबविण्यासाठी सरकारने एक सदस्य एक ईपीएफ खाते हे धोरण स्वीकारले आहे. खातेदारांना आता एकच युनिव्हर्सल अकाऊंट नंबर दिला जात आहे त्यामुळे आता कर्मचा-याने नोकरी बदलली तरी त्याचा हा क्रमांक कायम राहणार असल्याने त्याला या खात्याचा वापर करणे सुलभ होणार आहे, असेही मंत्र्यांनी सांगितले. ईपीएफकडे केल्या जाणा-या दाव्यांवर सध्या वेगाने निर्णय घेतले जात असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात या विभागाने ११८ लाख ६६ हजार दावे निकाली काढले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ईपीएफच्या खात्यांवर निधी पडून राहण्याची अनेक कारणे आहेत त्यामुळे कर्मचा-यांना ईपीएफची रक्कम मिळत नाही. मात्र ती रक्कम पीएफच्या खात्यावर पडून राहते. बहुतांश लोकांना माहीत नसते की, पीएफ काय प्रकार आहे आणि त्याची रक्कम मृत्यूनंतर कुटुंबालादेखील मिळते. वारसदाराकडे मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने ही रक्कम मिळत नाही. अनेक जण एका ठिकाणीची नोकरी सोडल्यानंतर किचकट प्रक्रिया समजून पीएफच्या रकमेकडे दुर्लक्ष करतात शिवाय लोकांना ईपीएफची रक्कम मिळण्याचा दावा करण्याची प्रक्रियाच माहीत नसते त्यासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांचीही माहिती नसते. जर कोण्या कर्मचा-याचा कर्तव्यावर, नोकरीवर असताना मृत्यू झाला तर त्या बाबतचे कंपनीकडून दिले जाणारे प्रमाणपत्र संबंधित वारसाकडे नसते. वारसाकडे बँक खाते नसणे, आदी कारणे ईपीएफची रक्कम न मिळण्याची आहेत. अशी तब्बल ४३ हजार कोटींची रक्कम पीएफ खात्यांमध्ये पडून आहे.

Leave a Comment