ब्रॅड पीट्सच्या नावाने ओळखली जाणार गांधीलमाशीची नवी प्रजाती

brad-pitt
बँकॉक – भारत व दक्षिण आफ्रिकेत गांधीलमाश्यांच्या दोन नवीन प्रजाती वैज्ञानिकांनी शोधल्या असून हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट याचे नाव त्यातील एका प्रजातीला देण्यात आले आहे. कोनोब्रेगमा ब्रॅडपिटी असे गांधील माश्यांच्या नव्या प्रजातीचे नाव ठेवले असून या माश्या पतंग व फुलपाखरांच्या अळ्यांवर वाढतात.

त्यांच्या यजमानाच्या शरीरात या माश्या अंडी घालतात व नंतर त्यापासून नवीन माश्या तयार होऊन त्या ममीभूत अळीतून बाहेर पडतात. या गांधीलमाश्यांचे वर्तन प्राणघातक असले तरी त्या शेतीसाठी फार उपकारक असतात. त्यांच्यामुळे जैवनियंत्रणाची क्रिया साधली जाते.

माश्यांच्या या प्रजाती संतोष श्रीविहार व अवुनजीकट्टू परामबिल रणजिथ या केरळच्या कालिकत विद्यापीठातील दोघांनी शोधल्या आहेत. त्यांनी शोधलेली आणखी दुसरी एक प्रजाती आहे ती परोपजीवीच असून भारतात या प्रजातीतील उपप्रजातीची ही माशी प्रथमच सापली आहे. तिच्या प्रजातीशी जवळ असलेल्या माश्या नेपाळमध्ये आहेत. नवीन माशीला नाव शोधत असताना थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठातील भूंतिका ए ब्यूटचर यांनी ब्रॅड पीटचे नाव देण्याचे ठरवले. कारण प्रयोगशाळेत अभ्यास करीत असताना त्यांना नेहमी ब्रॅड पीट्स हा अभिनेता म्हणून आवडत असे. ब्रॅड पीट्सचे नाव असलेली ही माशी २ मि. मी. पेक्षा लहान असून गडद तपकिरी किंवा जवळपास काळ्या रंगाची आहे. तिचे डोके, स्पृशा व पाय तपकिरी पिवळे आहेत. आतापर्यंतच्या माश्या व ही माशी यांच्यात केवळ चार फरक आहेत. सी. ब्रॅडपिटी ही माशी शोधल्याने माश्यांच्या वर्गीकरणात सुलभता आली आहे. जर्नल झुकीजमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

Leave a Comment