वाढत्या वयात या सोप्या उपायांनी रहा तरूण

ageing
वय वाढू लागले की चेहर्‍यावर सुरकुत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस पांढरे होणे, थकल्याच्या शरीरावर जागोजागी खुणा दिसणे सुरू होते. वय वाढेल तसे म्हातारपण येणार हा निसर्गाचा नियम. तो कुणालाही टाळता येत नाही मात्र रोजच्या जीवनात कांही पथ्ये नियमाने पाळली तर वाढत्या वयातही तरूण दिसणे सहज शक्य होते. त्यासाठी अगदी छोट्या गोष्टी मोठी किमया घडवितात. त्या कोणत्या त्याची माहिती.

झोप- झोप चांगली व पुरेशी असेल तर शरीर मुळातच चुस्त राहते. उर्जा व चांगल्या तब्येतीसाठी दिवसाकाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. पुरेशी झोप म्हातारपण दूर ठेवायला मदत करते हे ध्यानात ठेवा आणि झोपेशी कोणतीही तडजोड करू नका.

दिनचर्या- आपला दिवसभराचा कार्यक्रम पार पाडत असताना कांही सवयी अंगी बाणवा. सकाळी लवकर उठणे व खूप नाही तरी किमान २० मिनिटांचा हलका व्यायाम अथवा मोकळ्या हवेत एखादी रपेट मारण्याची सवय लावून घ्या. त्यानेही उर्जा व्यवस्थापनास मोठा हातभार लागतो.

डुलक्या काढू नका- काम करताना मध्येच एखादी छोटीशी डुलकी घेतली तर शरीरातील उर्जा प्रवाहित होते हे खरे आहे. मात्र तरीही शक्यतो दुपारच्या वेळात डुलकी न घेण्याची सवय लावा. झोप आलीच तर अन्य एखादे काम काढा, थोडे फिरा, बागकामासारखे मन रिझविणारे काम करा. यामुळे शरीर जादा सक्रीय होते व रात्री झोपही चांगली लागते.

कॉफी सेवन नियंत्रणात ठेवा- अनेकांना रात्रीच्या वेळी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी सेवनाने उर्जा नक्की मिळते पण रात्रीची झोप उडते हेही तितकेच खरे. आहाराचा शरीर स्वास्थ्याशी गाढ संबंध असतो हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अन्नसेवन करताना ते पौष्टीक असेल याची काळजी घ्यायला हवीच पण भरपेट खाणे नक्कीच टाळायला हवे. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतोच पण झोपेवरही त्याचा विपरित परिणाम होतो.

वरील उपाय रोजच्या जीवनाचा भाग बनविले तर म्हातारपण नक्कीच उशीरा येते व दीर्घकाळ तरूण दिसण्याचा आनंद नक्की लुटता येतो अगदी एक पैसाही खर्च न करता.

Leave a Comment