नरसिंह राव यांनी घडवला इतिहास

pv-narsingh-rao
१९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान असलेले कॉंग्रेसचे नेते पी.व्ही. नरसिंहराव हे कमीत कमी बोलण्याबाबत प्रसिद्ध होते. जेव्हा पाच वाक्ये बोलायची गरज असेल तेव्हा केवळ एक वाक्य बोला असे त्यांचे संवाद कौशल्य होते. निर्णय घेण्याबाबतही ते असेच मितभाषी होते. इंदिरा गांधी पक्षातल्या लहानसहान घटनांत लक्ष घालत असत पण नरसिंहराव पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज नसेल तर लक्ष घालता कामा नये अशा मतांचे होते. ते पंतप्रधान असताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. ४५ वर्षांचा नियंत्रित अर्थव्यवस्थेचा अनुभव काही चांगला नव्हता. भारताला १९९० साली आपले सोने गहाण टाकून परकीय चलनाची गरज भागवावी लागली होती. त्यामुळे राव यांनी ही अर्थव्यवस्था बदलून मुक्त अर्थव्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण दिले. २५ जुलै १९९१ रोजी त्यांनी सादर केलेल्या केन्द्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडले. तो दिवस आपल्या देशात आर्थिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा होत आहे.

या घटनेला येत्या २५ जुलै रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी नरसिंहराव यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे त्यांचे नवे चरित्र प्रकाशित होणार आहे. यापूर्वी नरसिंह राव यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध करून आपल्या आयुष्यावर बराच प्रकाश टाकला आहे. त्याचा मराठी अनुवाद इनसायडर या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. असे असले तरीही राव पंतप्रधान झाल्यानंतरच्या आणि त्या आसपासच्या काही घटनांच्या संदर्भात रावांनी घेतलेल्या काही निर्णयावर म्हणावा तेवढा प्रकाश पडलेला नाही. नरसिंहराव पंतप्रधान असताना बाबरी मशीद पाडण्यात आली. या बाबत अनेक प्रवाद आहेत. मशीद पाडण्यात नरसिंहराव यांचीच फूस होती असेही काही लोक सांगतात तर काही लोक रावांना या बाबत फसवण्यात आले असे म्हणतात. यावर या नव्या चरित्राप प्रकाश टाकण्यात आला आहे. श्री. विनय सीतापती यांनी नरसिंह राव यांच्या घरातला त्यांचा पत्रव्यवहार आणि काही नोंदी यांचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. नरसिंह राव यांनी हिंदुत्ववादी संघटनांशी बाबरी मशीद पाडण्याबाबत हातमिळवणी केली होती असा आरोप रावांच्यावर त्यांच्याच पक्षातून करण्यात आला होता. पण या लेखकाला तसे त्यांच्या निवासस्थानातल्या कागदपत्रात काही सापडले नाही. बाबरी नंतर रावांवर चिखलफेक करून त्यांना पंतप्रधानपदावरून हटवावे अशी कारस्थाने पक्षातच सुरू होती पण नरसिंह राव त्यांना पुरून उरले आणि त्यांनी आपले पद टिकवले.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदावर रावांच्या नावाला दुजोरा दिला होता पण ते फार अल्पकाळ या पदावर राहतील आणि नंतर आपणच पंतप्रधान होऊ अशी सोनिया गांधी यांची कल्पना होती पण नरसिंह राव यांनी त्यांची ही कल्पना फोल ठरवली त्यामुळे सोनिया गांधी यांना हाकलायला टपलेल्याच होत्या. या निमित्ताने सोनिया गांधी यांनी लिहिलेली काही पत्रे रावांच्या निवासस्थानी आहेत. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा नरसिंहराव हे गृहमंत्री होते. त्यामुळे या घटनेनंतर झालेल्या शीख विरोधी दंगलीत त्यांची गृहमंत्री म्हणून भूमिका काय होती असा प्रश्‍न अनेकदा उपस्थित होत असतो. या संबंधात या प्रस्तावित पुस्तकात मोठी निर्णायक माहिती येते. इंदिरा गांधी यांची हत्या सकाळी ११ वाजता झाली आणि त्यात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले पण तशी अधिकृत घोषणा सायंकाळी करण्यात आली. दुसरे दिवशी दिल्लीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शीखांची हत्या करण्यास सुरूवात केली. नरसिंह राव गृहमंत्री म्हणून या हिंसाचाराला पायबंद घालतील अशी भीती राजीव गांधी यांच्या सल्लागारांना होती. म्हणून एका सल्लागाराने दिल्लीतल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना फोन करून या पुढे त्यांनी गृहमंत्र्यांचे आदेश न घेता थेट पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश घ्यावेत असे फर्मावले. त्यामुळे दिल्लीतल्या जळितकांडाला आटोक्यात आणण्या बाबत नरसिंह राव यांना काहीही करता आले नाही.

नरसिंहराव हे देशातले गांधी नेहरू घराण्याबाहेरचे पहिले कॉंग्रेसी पंतप्रधान होते. त्यामुळे ते कसा कारभार करतात यावर अनेकांच्या नजरा होत्या. कारण समाजाच्या एका वर्गात का होईना पण या देशावर या घराण्याचाच कोणीही वारसदार राज्य करू शकतो आणि अन्य कोणात ती क्षमता असूच शकत नाही असा विश्‍वास होता. नरसिंह राव यांना मात्र राजीव गांधी आणि त्यातल्या त्यात सोनिया गांधी यांच्या क्षमतांची चांगलीच माहिती होती. राजीव गांधी यांनी पंतप्रधान व्हायला नको असे त्यांचे मत होते आणि सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाला तर ते स्वत:च आडवे आले होते. सोनिया गांधी यांनी अनेक प्रकारांनी प्रयत्न केला पण नरसिंह राव यांंनी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पुरी होऊ दिली नाही. शेवटी सोनिया गांधी यांंनी रावांच्या विरोधात पक्षातल्याच अर्जुनसिंग आणि एन डी तिवारी यांंना खडे केले पण त्यांना याही मार्गाने पंतप्रधान होता आले नाही. गजपती यांच्या या पुस्तकात नरसिंह राव आणि सोनिया गांधी या दोघांच्या संबंधावर चांगलाच प्रकाश टाकला आहे. २००४ साली सोनिया गांधी यांनी चालून आलेले पंतप्रधानपद नाकारले आणि फार मोठा त्याग केला असे कॉंग्रेसचे नेते भासवतात पण प्रत्यक्षात सोनिया गांधी या पदाला हपापलेल्या होत्या असे या पुस्तकात दाखवूून देण्यात आले आहे.

Leave a Comment